0

 दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही देशांच्या फ्रीडम मालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही मालिका कोविडच्या ओमायक्रॉनच्या नवीन प्रकाराच्या धोक्यात होत आहे त्यामुळे संघ वेगवेगळ्या मैदानांवर सराव करत आहेत. भारतीय संघ सुपरस्पोर्ट पार्कमध्ये सराव करतोय. येथे रविवारपासून तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू होईल. त्याचबरोबर यजमान संघ वांडरर्स (जोहान्सबर्ग) येथे घाम गाळत आहेत, जिथे दुसरी कसोटी होणार आहे. कोविड-१९ मुळे दोन्ही संघांनी सराव सामनेही खेळले नाहीत. सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग दोन्ही गौतेंग प्रांतात आहेत, जिथे नुकताच पाऊस पडला. द. आफ्रिका हवामान खात्याने वर्षाच्या अखेरीस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, सूर्यप्रकाशही पडेल. पावसाळी वातावरणामुळे सुपरस्पोर्ट पार्कची खेळपट्टी अधिक आव्हानात्मक बनवू शकते.

नाणेफेक जिंकणाऱ्या टीमची फलंदाजीला पसंती; प्रत्युत्तरात धावा काढणे अवघड
तज्ज्ञांच्या मते, पहिल्या दिवशी सेंच्युरियनची खेळपट्टी मऊ आणि संथ असेल. सततच्या उसळीमुळे गोलंदाजांना फारशी मदत मिळण्याची अपेक्षा नाही. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी गोलंदाजांसाठी खेळपट्टी हळूहळू उपयुक्त ठरेल. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत असल्याने भारतीय कर्णधार कोहलीला नाणेफेक आपल्या बाजूने हवी आहे. जसजसा सामना पुढे जाईल तसे धावा काढणे कठीण होईल. संयमाने फलंदाजी केली तरच धावा निघतील. सेंच्युरियनमध्ये वेगाने गडी बाद होण्यास सुरुवात झाल्यास सावरणे कठीण जाते. मात्र, भारतीय संघात अशा परिस्थितीत खेळणारे खेळाडू आहेत. धावा काढण्यासाठी फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहणे खूप महत्त्वाचे राहील. त्याचबरोबर गडी बाद करायचा असेल तर लाईन-लेंथ अचूक ठेवावी लागेल. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर म्हणाला, “हाईवेल्डची (सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग) खेळपट्टी नेहमीच थोडी वेगळी असते. त्यात फारसा बदल झालेला दिसत नाही. दोन्ही संघ आधी मोठी आणि नंतर वेगवान धावसंख्येसाठी एकाच डावपेचावर काम करतील.

जाेहान्सबर्गमध्ये हाेणार अव्वल-१०० खेळाडूंच्या हाल ऑफ फेमचे अनावरण
ही मालिका द. आफ्रिका आणि भारत यांच्यातील क्रिकेट संबंधांना ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने होत आहे. ३ जानेवारीपासून वांडरर्स स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान त्यानिमित्त जल्लोष केला जाईल. आयसीसीची बंदी हटवल्यानंतर द. आफ्रिकेने १९९२ मध्ये २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान भारताविरुद्ध घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला होता. क्रिकेट द. आफ्रिकेने सांगितले की, “आम्ही हा प्रसंग दोन्ही संघांसाठी संस्मरणीय बनवू. अव्वल १०० खेळाडूंच्या हॉल ऑफ फेमचे अनावरण ६६ वर्षे जुन्या वांडरर्स स्टेडियमवर होणार आहे. यात देशी, विदेशी, महिला सर्वजण असतील. देशात क्रिकेटच्या विकासासाठी काम करणाऱ्या मैदानाबाहेरील दिग्गजांना ओळखून त्यांचा सन्मान केला जाईल. वॉक ऑफ फेमचे अनावरण होणार आहे.

Post a Comment

 
Top