कोरोनाच्या धोक्यापासून सावरत असताना जगभर नवीन धोकादायक "ओमायक्रॉन" नावाचा कोरोना विषाणू युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रिया, युके व इतर युरोपियन देशात आला आहे. शास्त्रज्ञांनी याचे वर्णन 'भयावह' अशा शब्दांमध्ये केले आहे. हा विषाणू कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही संक्रमित करत आहे. मात्र ज्यांना कोरोना विषाणूची लागण होऊन गेली, त्यांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीनंतर हा विषाणू किती संक्रमित करत आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
CovidRxExchange चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शशांक हेडा हे कोविडशी संबंधित पॉलिसी मेकिंगमध्ये अनेक सरकारांना सल्ला देतात. यात महाराष्ट्र सरकारचाही समावेश आहे. आम्ही त्यांच्याशी बातचित करुन महाराष्ट्र सरकार ओमायक्रॉनचा महाराष्ट्रातील प्रवेश रोखण्यासाठी कोणती खबरदारी घेत आहे, यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. डॉ. शशांक हेडा हे मुळचे अमरावतीचे असून नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. दहा वर्षे ते मुंबईतही कार्यरत होते. आता ते अमेरिकेत वास्तव्याला आहेत.
- ओमायक्रॉनशी लढण्यासाठी महाराष्ट्र सरकार किती तयार आहे?
डॉ. शशांक हेडा सांगतात, दक्षिण आफ्रिकेमध्ये 24 नोव्हेंबर रोजी ओमायक्रॉन हा विषाणू आढळला तेव्हापासून माझी महाराष्ट्र सरकारच्या कोविड टास्क प्रमुखांशी बातचीत सुरु आहे. माझ्या मते कोविडसंदर्भात महाराष्ट्र सरकार खूप चांगले काम करत आहे. परंतु सरकारसमोर एक मोठे आव्हान आहे. कारण परदेशातून आलेले लोक हे मुख्यत्वे मुंबईत दाखल होतात. आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध काय असणार हा केंद्राचा निर्णय असतो. त्यात राज्य सरकार काही करु शकत नाही. परदेशातून आलेल्या प्रवाशांवरील निर्बंध हे राज्य सरकारच्या हातात नाही. त्यामुळे परदेशातून आलेल्या लोकांमुळे हा विषाणू पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
- महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीविषयी काय सांगाल?
महाराष्ट्र सरकारमधील तज्ज्ञ मंडळी खूप वैचारिक आहे. डॉ. प्रदीप व्यास, इकबाल सिंग चहल, काकाणी, म्हैसेकर यांसह अनेक लोक महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचे काम चोख करत आहेत, असे मला वाटते. त्यांना नेमके काय करायचे आहे, हे चांगले ठाऊक आहे. आम्ही सर्व एकत्र काम करत आहोत. मुख्यमंत्र्यांशी ते सतत चर्चा करत आहे. ते जे काही निर्णय घेतात, त्याचे कौतुक आहे.
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शाळा सुरु करणे हा निर्णय कितपत योग्य आहे?
कोणतेही बंधने लादताना त्याला होणारा विरोध हे बघणे गरजेचे आहे. सध्या 15 डिसेंबरपर्यंत शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. या दोन आठवड्यांत आम्हाला हा विषाणू खरंच वाढतोय का की कमी होतोय, असा बराच विचार करायला कालावधी मिळणार आहे. त्यानुसार शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढे घेतला जाईल.
लहान मुलांना ओमायक्रॉनचा किती धोका आहे?
दक्षिण आफ्रिकेत एचआयव्हीची लागण झालेले, एखादा गंभीर आजार असलेले आणि लसीचे डोस न घेतलेल्या लोकांमुळे ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे. म्हणून लसीकरण करणे हे खूप महत्त्वाचे आहे. सध्या लहान मुलांसाठी हा विषाणू किती धोकादायक आहे किंवा नाही, हे सध्याच्या परिस्थितीत सांगणे खूप कठीण आहे.
- ओमायक्रॉनचे म्युटेशन वाढू शकतात का?
ओमायक्रॉन हा कोविड प्रकारातील नवीन विषाणू आहे. ज्या प्रकारे माणसांच्या पिढ्यांमध्ये बदल दिसून येतात, तसेच विषाणूंच्या बाबतीत असते. तसं पाहिलं तर विषाणू खूप छोटा आहे, पण त्याचे जेनेटिक मटेरियल खूप मोठे आहे. त्यामुळे म्युटेशन हे होतच राहणार आहेत.
- ओमायक्रॉनसाठी बुस्टर डोस प्रभावी ठरु शकेल का?
सर्वप्रथम याबाबात काहीही सांगणे घाईचे ठरेल. पण कोरोनासाठी सर्वप्रथम स्वतःचे लसीकरण करुन घेणे महत्त्वाचे आहे. लसीकरणाला दुसरा पर्याय नाही. त्यानंतर आपण बुस्टर डोसचा विचार करायला हवा. कोरोनाचा डेल्टा विषाणूनपासूनही स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. लसीकरण केले नाही तर कोरोनाचा धोका अधिक पटीने वाढतो. अशापरिस्थितीत प्रत्येकाने लसीकरण करायला हवे. विशेष म्हणेज ओमायक्रॉनसाठी लवकरच बाजारात नवीन बुस्टर डोस येणार आहे.
Post a Comment