0

 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जींनी मंगळवारी सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेऊन शिवसेना नेते संजय राऊत आदित्य ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असताना ममता दीदींचं कौतुक करत असताना भाजपवर जोरदार निशाणा साधला.

ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये वाघिणीसारखी झुंज देऊन सगळ्या लांडग्यांना पळवून लावले. त्यामुळे संपूर्ण देश आज त्यांच्याकडे प्रमुख नेता म्हणून पाहतो. त्यामुळे ममता दीदींच्या शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे असोत यांच्यासोबतच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये डावे भुईसपाट झाले, काँग्रेसचे तर अस्तित्वच राहिलेले नाही. भाजपचे बँडबाजा पथक तिकडे गेले होते पण ममतादीदींनी त्यांची हवाच काढून घेतली म्हणत संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला.

भाजपचे प्रमुख कार्यकर्ते, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांनी सध्या देशात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यांच्या माध्यमातून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असेच महान कार्य भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्येही करत आहेत. परंतू ममता दीदी तिकडे त्यांना पुरुन उरल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र देखील या दहशतवाद्यांचा सामना करेल, म्हणूनच जय मराठा, जय बांगला अशी घोषणा ममता दीदींनी दिल्याचे संजय राऊत म्हणाले.

Post a Comment

 
Top