0

 जागतिक वित्तीय केंद्र जेव्हा मुंबईतून गुजरातमध्ये हलवण्यात आले तेव्हा महाराष्ट्रातले भाजप नेते का गप्प होते, असा सवाल उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी (ता. २) उपस्थित केला. जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराष्ट्रात आले ते उद्योग पळवण्यासाठीच आले होते काय, अशी विचारणाही देसाई यांनी भाजप नेत्यांना केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी नुकत्याच मुंबईच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आल्या होत्या, त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली होती. तसेच मुंबईतील उद्योग पश्चिम बंगालमध्ये नेण्यास आघाडी सरकार मदत करत असल्याचा आरोप केला होता.

आज मुंबईमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व्हायब्रंट गुजरातच्या प्रचारासाठी आले आहेत. याबाबत भाजप नेते का बोलत नाहीत, असा प्रश्न त्यांनी केला. यापूर्वी अनेकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी मुंबईत आले होते, तेव्हा भाजप नेते का गप्प होते, योगी यांनी मुंबईतून किती उद्योग पळविले असा प्रश्न विचारून तेव्हा भाजप नेते योगींसाठी का पायघड्या घालत होते, असा जाब त्यांनी विचारला.

देसाई म्हणाले, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मागच्या दोन वर्षांत ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशातून आणली आहे. नुकत्याच दुबईमध्ये झालेल्या उद्योगांच्या मेळाव्यात आपण १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे, असे सांगून आमचा उद्योग पळण्यावर विश्वास नसून परदेशातून गुंतवणूक आणण्याकडे आहे, असा दावा देसाई यांनी केला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी भाजपला पोटदुखी आहे, अशी टीकाही देसाई यांनी केली. शिवसेना पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्रात मोठा होत आहे, त्याचा फटका भाजपला बसतो आहे. त्यामुळे भाजप वड्याचे तेल वांग्यावर काढत असल्याचे देसाई म्हणाले.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि युवा सेना अध्यक्ष व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट राजकीय मैत्री संदर्भात होती, असा दावाही सुभाष देसाई यांनी केला.

वित्तीय केंद्र मोदी सरकारने मुंबईतून गुजरातमध्ये हलवले आहे, तरी महाराष्ट्र विकास आघाडी नवे वित्तीय केंद्र मुंबईत उभे करेल, असा दावाही देसाई यांनी केला.

Post a Comment

 
Top