भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना आणि भाजप गुरुवारी (९ डिसेंबर) आमने-सामने आले. पेडणेकर यांनी शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सेना खासदार संजय राऊत यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणावरून सुरू झालेला वाद आगामी महापालिका निवडणुकीतील संघर्षाची नांदी असल्याचे मानले जात आहे.
या मुलाखतीत संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. त्यामुळे संजय राऊत आणि शेलार यांना समान न्याय लावावा, पोलिसांनी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मरीन लाइन्स पोलिस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात आशिष शेलार यांचा गुरुवारी पोलिस मरीन लाइन्स ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला. त्या वेळी मरीन लाइन्स पोलिस ठाण्याबाहेर भाजपचे बडे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कागदी वाघांना आम्ही घाबरणार नसल्याचे म्हणत राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. सकाळपासून आशिष शेलार यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपतील नेते अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा आदी शेलार यांच्यासह उपस्थित होते. या वेळी शेलार यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर टीका केली.
Post a Comment