0

 

दहशतवादाचा सामना:देशातून दहशतवाद संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

देश स्वातंत्र्यापासून दहशतवादाचा सामना करत आहे. येत्या काळात दहशतवाद संपवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे निक्षूण सांगितले.

दोंडाईचा येथे देशाचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांच्या नावाने रस्त्याचा नामकरण सोहळा राजनाथसिंह यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला. याशिवाय दोंडाईचा नगरपालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. राजनाथ म्हणाले, देशातील दहशतवाद्यांना सोडणार नाहीच, पण इतर देशांमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांना संपवण्याचे काम सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून केंद्र सरकारने केले आहे. सबका साथ सबका विकास हेच ध्येय घेऊन सरकार काम करत आहे. सध्या देशाची तीन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाली असून पुढील तीन ते चार वर्षांत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यावर जगात टॉप-३ देशांमध्ये भारताचा समावेश होईल.

भाजपने जाहीरनाम्यात ३७० कलम हटवण्याचे आश्वासन दिले होते. त्या वेळी विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र, प्रत्यक्षात हे कलम हटवून काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून दिला, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकारसाहेब रावल, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, मुख्याधिकारी प्रवीण निकम, धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे, जि.प.चे अध्यक्ष तुषार रंधे आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top