0

 अगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी....बोल अहंकारा, सदानंदाचा येळकोट' हे गाणं ऐकू आलं की, घड्याळही न पाहता सात वाजले हे कळायचं. सात ते साडेसात या वेळेत शक्यतो घरी फोन करायचाच नाही, कारण तेव्हा सगळेजण 'जय मल्हार' पाहत असणार हे माहितीच असायचं. अनेक घरांमध्ये हे चित्र होतं. गावाकडे लोक आता खंडोबाची मालिका लागेल असं म्हणून गडबडीनं टीव्ही सुरू करायचे.

झी मराठी चॅनेलवर साधारण सात वर्षांपूर्वी 'जय मल्हार' ही मालिका सुरू झाली होती. तोपर्यंत रामायण, महाभारत, कृष्णलीला किंवा हनुमान-शंकराच्याच गोष्टी सीरिअलमधून पाहिल्या होत्या, त्याही प्रामुख्याने हिंदी चॅनेलवर.महाराष्ट्रातले बहुसंख्य लोक ज्या देवाला मानतात, त्याची गोष्ट मालिकेच्या माध्यमातून समोर येण्याची कदाचित ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आजपर्यंत वेगवेगळ्या चॅनेल्सवर धार्मिक-आध्यात्मिक विषयांवरच्या वेगवेगळ्या मालिका सुरू झाल्याचं चित्र दिसतं.

मराठी लोकांची जी काही श्रद्धास्थानं आहेत, अशा देवतांच्या गोष्टी दाखवल्या जाऊ लागल्या. महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, आध्यात्मिक जडणघडणीत ज्यांचं योगदान आहे, अशा संतांची चरित्रंही मालिकांमधून पाहायला मिळाली.

विठू माऊली, दख्खनचा राजा ज्योतिबा, आई माझी काळूबाई, श्री गुरुदेव दत्त, तू माझा सांगाती, कृपासिंधू, ब्रह्मांडनायक अशा मालिका वेगवेगळ्या वाहिन्यांवरून प्रक्षेपित झाल्यासध्याच्या घडीलाही झी मराठी, कलर्स मराठी, सोनी मराठी, स्टार प्रवाहसारख्या वाहिन्यांवर घेतला वसा टाकू नको, जय जय स्वामी समर्थ, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, गाथा नवनाथांची, ज्ञानेश्वर माऊली अशा धार्मिक-आध्यात्मिक मालिका सुरू आहेत. या मालिकांना प्रेक्षकांची पसंतीही मिळत आहे. केवळ मराठीच नाही, हिंदी वाहिन्यांवरही अशा मालिकांचा ठराविक प्रेक्षकवर्ग आहे.सध्या मराठी वाहिन्यांवर या मालिकांचा ट्रेंड का वाढतो आहे? या मालिकांचा टार्गेट ऑडिअन्स नेमका कोण असतो? या मालिकांमागची व्यावसायिक गणितं काय असतात? अशा मालिका जेव्हा केल्या जातात तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातला समतोल सांभाळणं किती आवश्यक आहे आणि खरंच तो तसा सांभाळला जातो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.

.Post a Comment

 
Top