उत्तर भारतात हिमवृष्टी होत असून तिकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये शनिवारी (दि.२५) ६.५ एवढ्या राज्यातील नीचांकी तपमानाची नोंद करण्यात आली. या हंगामातील हे तेथील सर्वात कमी तपमान ठरले आहे. नाशकात पारा १०.५, औरंगाबादेत १२, पुण्यात १२.८ तर मालेगावी १३ अंशावर घसरला होता. नागरिकांना हुडहुडी भरली असून द्राक्षांसह इतर पिकेही संकटात सापडल्याने शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून काहीशा ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर ओसरला होता. मात्र, शुक्रवारपासून तो वाढला आहे. दोन वर्ष कोरोनामुळे उत्पादन खर्चही न फेडता आलेल्या द्राक्ष बागायतदारांना चालू हंगामात नैसर्गिक संकटाने हैराण केले आहे. डिसेंबरच्या प्रारंभीच अवकाळीच्या कचाट्यात फुलोरा अवस्थेतील द्राक्षमालाची घडकूज अन् मणीगळ झाली. आता आठ ते दहा दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने महिन्यातच दुसऱ्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली असून परिपक्व द्राक्षमण्यांना तडे जात आहेत व मण्यांची फुगवण थांबली आहे. शेतकरी पहाटेच्या वेळी द्राक्षबागांत शेकोट्या पेटवत धूर व उष्णता निर्माण करत तपमान नियंत्रित राहून मण्यांना तडे जाणार नाहीत, यासाठी काळजी घेत आहेत. पहाटेपासून सूर्योदयापर्यंत ठिबकद्वारे पाणी देऊन मुळी व पेशींचे कार्य सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. निफाड, उगाव, सारोळे, सोनेवाडी, नांदुर्डी पंचक्रोशीतील बागा संकटात आहेत. कडाक्याची थंडी व् त्यानंतर सूर्यप्रकाशात राहिलेल्या द्राक्षघडांना सनबर्निंगचा फटका बसला आहे. अशा द्राक्षघडांवरील मणी सुकत आहेत. तडे गेलेले व सुकत असलेले द्राक्षमणी विरळणी करण्याचा द्राक्षबागायतदारांचा खर्च वाढला आहे.
राज्यात पावसाचाही इशारा
बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात विदर्भासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, २८ ते २९ डिसेंबरला उत्तर खान्देशात गारपिटीची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
Post a Comment