इगतपुरी तालुक्यातील ऐतिहासिक त्रिंगलवाडी किल्ल्याला संरक्षक स्वरूप देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक व सह्याद्री प्रतिष्ठान शहापूर, सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि इगतपुरी तालुक्यातील दुर्गप्रेमी युवक झपाटून गेले आहेत. हा किल्ला २ हजार ९०० फूट उंच असून चढाईला अतिशय खडतर आहे. मात्र, एवढ्या मोठ्या उंचीवर १ हजार किलो वजनाचे सागवानी महाद्वार युवकांनी वाहून नेले आहे.
रविवारी ( १२ डिसेंबर) पहाटे साडेसहा वाजता सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाशिक विभागाचे अध्यक्ष साईनाथ सरोदे, शहापूर विभागाचे अध्यक्ष अनिरुद्ध थोरात यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाला सुरुवात झाली. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास हा दरवाजा किल्ल्यावर बसविण्यात आला. अवघ्या सात तासांत सह्याद्रीच्या मावळ्यांनी ही मोहीम फत्ते केली. हा एक हजार किलो वजनाचा दरवाजा वाहून नेण्यासाठी सह्याद्रीच्या ६० मावळ्यांनी योगदान दिले.
त्रिंगलवाडी किल्ल्यासाठी हे सागवानी महाप्रवेशद्वार निर्माण करण्यात आले आहे. याची उंची ८.५ फूट आणि रुंदी ३.४ फूट असून १००० किलो वजन आहे. १ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त किमतीचा हा दरवाजा असून त्यासाठी युवकांनी आपापल्यापरीने योगदान देत पदरमोड करून रक्कम जमा केली. यासाठी लोकवर्गणीही जमवली. दरवाजाचा दुर्गार्पण सोहळा १९ डिसेंबरला त्रिंगलवाडी किल्ल्यावर उत्साहात होणार आहे. ‘आम्हा तरुणाईला वेड शिवरायांच्या इतिहासाचे व दुर्गसंवर्धनाचे’ असा जयजयकार करत महाद्वार बसविण्याची मोहीम यशस्वी झाली.
पायरी मार्ग, शिवकालीन हौदांची दुरुस्ती...
किल्ले त्रिंगलवाडी प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी असलेला पायरी मार्ग मोठी दरड कोसळल्यामुळे कित्येक वर्षांपासून बंद होता. सह्याद्रीच्या मावळ्यांनी या पायरी मार्गावरील दरड दूर करत हा मार्ग मोकळा केल्यामुळे त्रिंगलवाडी किल्ल्यावर जाणारे पर्यटक आणि इतिहासप्रेमींची ‘वाट’ मोकळी झाली आहे. याशिवाय या किल्ल्यावर इतिहासकालीन मोठमोठे हौद श्रमदान करत मोकळे केले. गत पावसाळ्यात त्यात पाणी साचले. त्यामुळे गडावर जाणाऱ्या माणसांबरोबर पशु-पक्ष्यांची तहान भागवण्यास मदत झाली आहे.
Post a Comment