0

 टायगर श्रॉफच्या 'गणपत'ला इंग्लंडमध्ये कोविड आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांचा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. दिव्य मराठीला विशेष माहिती शेअर करताना सेटवर उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, "दोन दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये कोरोनाची एक लाखांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत मागील दीड महिन्यांपासून तेथे चित्रीकरण सुरु असलेल्या 'गणपत'च्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. परिस्थिती सामान्य राहिल्यास 7 जानेवारीपर्यंत शुटिंग इंग्लंडमध्ये होणार होते, मात्र आता ओमायक्रॉनमुळे परिस्थिती बदलली आहे. कलाकार आणि क्रू 27 डिसेंबरपासून भारतात परतणार आहे. हा चित्रपट प्रत्यक्षात 69 वर्षे पुढचा आहे. परिणामी, चित्रपटाचे फ्युचर सिटीज सीक्वेन्स इंग्लंडमध्ये शूट केले जात होते."

सूत्रांनी पुढे सांगितले की, "मुंबईला परतल्यावर झोपडपट्टीचा काही भाग धारावी येथे चित्रित केला जाणार होता. त्याचे वेळापत्रक नवीन वर्षात मिड जानेवारीपासून निश्चित करण्यात आले होते. इंग्लंडमध्ये ख्रिसमसनंतर लॉकडाऊन किंवा निर्बंधांत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत भारतातील 100 ते 150 लोकांची टीम इंग्लंडमध्ये अडकून पडावी, असे निर्मात्यांना वाटत नाही. विशेष म्हणजे त्याचे निर्मातेही पूजा फिल्म्स हेच आहेत, त्यांनी यापूर्वी 'बेलबॉटम'चे शूटिंग इंग्लंडमध्ये केले होते. गेल्या वर्षी पहिले लॉकडाऊन उठताच तिथे 'बेलबॉटम'चे चित्रीकरण करण्यात आले होते. बेलबॉटमच्या रिलीजनंतर लगेचच 'मिशन सिंड्रेला'चे चित्रीकरण तिथे पूर्ण करण्यात आले होते. कलाकार आणि क्रू यांच्यापैकी एकालाही कोविडची लागण झाली नव्हती. 'गणपत'च्या सेटवरदेखील एकाही क्रू किंवा कलाकाराला संसर्ग झाला नाही.'

'गणपत' पुढील वर्षी ख्रिसमसला रिलीज होणार आहे
विकास बहल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 'सुपर 30'च्या टीमकडूनच त्यांनी चित्रपटाची कथा लिहून घेतली आहे. सुपर 30 चे संवाद लिहिणारे लेखक संजीव दत्ता यांनीच गणपत या चित्रपटासाठीही संवाद लेखन केले आहे. 'गणपत'चा पहिला भाग पुढील वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर चित्रपटाचे आणखी दोन भाग बनवले जाणार आहेत.

Post a Comment

 
Top