अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यंदाच्या ख्रिसमससाठी तिच्या घरी जाऊ शकणार नाही. ईडीने तिला भारताबाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही. कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आल्याने तिच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने जॅकलिनची अनेकवेळा चौकशी केली आहे. ईडीची कॉनमॅनने जॅकलिनला दिलेल्या सर्व भेटवस्तू जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
यापूर्वीही जॅकलिनला ईडीने भारताबाहेर जाण्यास मनाई केली होती. अभिनेत्रीला तिच्या प्रोफेशनल कमिटमेंटमुळे रियाधला जायचे होते, परंतु ईडीने तिला मुंबई विमानतळावर रोखले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे आणि तिला अद्याप याप्रकरणी क्लीन चिट मिळालेली नाही. यामुळे ती भारताबाहेर जाऊ शकत नाही.
सुकेश अनेक सेलिब्रिटींच्या संपर्कात होता
या प्रकरणात कॉनमॅनने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याशिवाय श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी आणि हरमन बावेजा यांसारख्या बॉलिवूड स्टार्सची नावे उघड केली आहेत. सुकेशने त्याच्या जबाबात ईडीला सांगितले की, तो हरमन बावेजाला ओळखत होता आणि त्याचा पुढचा चित्रपट 'कॅप्टन'साठी सह-निर्मितीची योजना आखत होता. या चित्रपटात कार्तिक आर्यनला मुख्य भूमिकेत साईन करणार असल्याची चर्चा होती. पती राज कुंद्राची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी शिल्पाने माझ्याशी संपर्क साधल्याचेही त्याने सांगितले होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रॅनबॅक्सीचे माजी संस्थापकाला तुरुंगातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने सुकेशने 200 कोटींची फसवणूक केली आहे. हा पैसा तो चित्रपट कलाकारांवर खर्च करत असल्याचे बोलले जात आहे. सुकेशने तुरुंगातूनच अनेक अभिनेत्रींशी फोनवर संपर्क साधला आणि स्वत:ला खूप मोठा माणूस असल्याचे सांगत त्यांना आपल्या जाळ्यात अडकवले. त्यांना महागड्या भेटवस्तू दिल्या. यामध्ये महागडी वाहने, दागिने आणि विमान प्रवास खर्चाचा समावेश आहे. याच लालसेपोटी चाहत खन्ना, नेहा कपूर आणि नोरा फतेही तिहार तुरुंगात सुकेशला अनेकदा भेटल्याचा दावा केला जात आहे.
कोण आहे कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर?
सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरू येथील रहिवासी आहेत. लॅव्हिश लाइफस्टाइल जगण्यासाठी त्याने वयाच्या 17 व्या वर्षापासून लोकांची फसवणूक सुरू केल्याचे सांगितले जाते. बंगळुरूमध्ये फसवणूक केल्यानंतर त्याने चेन्नई आणि इतर शहरातील लोकांनाही टार्गेट केले.
सुकेश हा उच्चभ्रू लोकांना फोन करायचा आणि स्वतः मोठा सरकारी अधिकारी असल्याचे सांगायचा. 2007 मध्ये त्याने बंगळुरू डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात 100 हून अधिक लोकांची फसवणूक त्याने केली होती, यावेळी त्याने स्वत:ला बडा सरकारी अधिकारी असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी सुकेशला अटकही करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर सुकेशने पुन्हा लोकांना फसवण्याचे काम सुरू ठेवले. सुकेशवर ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
तामिळनाडूमध्ये तो स्वत:ला माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचा मुलगा असल्याचे सागंत होता. त्याने स्वतःला आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचा पुतण्या असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक केली आहे.
Post a Comment