0

 सुफी ही इस्लाममधील एक विचारधारा... आध्यात्मिकता आणि प्रेम यांचा मेळ साधणारी. आणि त्यामुळे पोथीपुराणात, रूढीपरंपरेत न अडकता जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी आणि प्रेमाच्या आधारे ईश्वरी साक्षात्काराची भाषा करणारी... साहजिकच या विचारधारेचे पाईक असणाऱ्या सुफी संतांच्या काव्य रचनेत प्रेम आणि त्यातील उत्कटता स्वर्गीयता आली नसती तर नवलच.

प्रेम ही वर्षभर करण्याची गोष्ट असली तरी व्हॅलेंटाईन डे आला की या आपल्या सर्वांच्या आवडत्या या विषयावरील चर्चेला उधाण येतं... जणू या माहौलविषयीच "खुदा ए सुखन' म्हणजे शायरीचा खुदा म्हणवला जाणारा मीर तक़ी मीर आपल्या एका शेर मध्ये म्हणतो,

इश्क़ ही इश्क़ है जहाँ देखो

सारे आलम में भर रहा है इश्क़

तर या "अंदाज ए इश्क़' वर उर्दूत जितकं लिहिलं गेलंय तितकं दुसऱ्या कोणत्या भाषेत खचितच लिहिलं गेलं असेल. त्यामुळेच भारतीय उपखंडातला प्रत्येक आशिक आपल्या कधी न कधी उर्दू शायरीचा आधार घेतोच घेतो! या उर्दू शायरीमध्ये काही कथा, रूपके काही पात्र हमखास भेटतात. उदा. लैला मजनू, हिर रांझा, शिरीन फरहाद वगैरे.. मुळचा आपल्या महाराष्ट्राचा असलेला आणि उर्दूचा पहिला शायर म्हणून नावलौकिक असलेला वली दकनी याच्या शायरीपासून ते अलीकडे तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या तहजीब हाफी या तरूणापर्यंत आणि गुलजारपासून ते इर्शाद कामिलपर्यंत जवळपास प्रत्येक गीतकाराने या रूपकांचा वापर केलेला आढळतो. ही पात्र मुळची सुफी काव्यातली. सुफी काव्यात असं उत्कट प्रेम करणारी असंख्य पात्र येतात. आपल्याकडे रोमांटिक गाण्यांमध्ये सुफी गाणी प्रचंड लोकप्रिय ठरतात. एक काळ असा होता की सुफी गाणं असल्याशिवाय गाण्याचा अल्बम पूर्ण होत नसे. आता या गाण्यांच्या सुफी काव्याशी किंवा सुफींच्या प्रेम या संकल्पनेशी कितीसा संबंध होता हा भाग तूर्तास बाजूला जरी ठेवला तरी या गाण्यांच्या प्रेरणा सुफी होत्या हे मात्र खरं. "अन्वर'मधले मौला मेरे मौला, जावेदा जिंदगी ही गाणी त्यातल्या त्यात या संकल्पनेच्या जवळ जाणारी.

सुफी ही इस्लाममधील एक विचारधारा... आध्यात्मिकता आणि प्रेम यांचा मेळ साधणारी. आणि त्यामुळे पोथीपुराणात, रूढीपरंपरेत न अडकता जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी आणि प्रेमाच्या आधारे ईश्वरी साक्षात्काराची भाषा करणारी... साहजिकच या विचारधारेचे पाईक असणाऱ्या सुफी संतांच्या काव्य रचनेत प्रेम आणि त्यातील उत्कटता स्वर्गीयता आली नसती तर नवलच. सुफी काव्य प्रेम दोन प्रकारे व्यक्त होतं. पहिलं – इश्क ए मजाझी (व्यक्तीवर केलेलं प्रेम) आणि दुसरं – इश्क ए हक़िकी (ईश्वरावर केलेलं प्रेम) पण अनेकदा सुफी काव्यांत "इश्क ए मजाझी'ची रूपके वापरून "इश्क़ ए हक़िकी'चे महत्त्व पटवून दिले जाते.. सुफी काव्यात लैलाच्या प्रेमात वेडा झालेला मजनू (याचा काही ठिकाणी कैस असाही उल्लेख येतो) आणि ईश्वराशी प्रेमाचा दावा करणारा देवभक्त (किंवा मुल्ला मौलवी) यांचे अनेक उल्लेख येतात. त्यापैकी हा एक. मौलवी (उर्दू शायरीत यांचा उल्लेख बरेचदा जाहिद किंवा शेख म्हणून केला जातो. आणि शायर यांचा सर्रास उपहास करताना आढळतात) जानमाज (हे अंथरून यावर नमाज अदा केली जाते) अंथरून नमाज अदा करतोय. त्याचवेळी लैलाच्या शोधात सैरभैर फिरणारा आपल्याच धुंदीत असलेला मजनू मौलवी समोर येतो आणि जानमाज तुडवत त्याच्यासमोरून तसच पुढ निघून जातो. तुम्ही नमाज अदा करत असाल आणि तुमच्या समोरून कुणी गेलं की नमाज तुटते. मजनू थेट समोरून गेल्यामुळे मौलवी खवळून उठतो आणि नमाज तशीच सोडून मजनूच्या मागे पळत जात त्याला धरून बडवू लागतो आणि आपल्या ईश्वरभक्तीत विघ्न आणल्याबद्दल मजनूला खडसावतो. त्यावर मजनू म्हणतो- ‘मी लैलाभक्तीत इतका तल्लीन झालो होतो की मला तिच्याशिवाय काहीच दिसत नव्हते.. त्यामानाने तुझी ईश्वरभक्ती जरा कमीच पडली’

बाबा बुल्लेहशाह या पंजाबी सुफी संताच्या ‘काफिया’मध्येही उत्कट प्रेमाची अनेक रूपं दिसतात. सोबतच त्यात जातीव्यवस्थेवर, रूढी परंपरांवरही आसूड ओढलेले दिसतात. बाबा बुल्लेहने आपल्या गुरुवरील प्रेमातून अनेक काव्य लिहिली. बहुदा त्यातील एका काव्यातील ओळीपासून प्रेरणा घेऊनच गुलजार यांनी ‘छैय्या छैय्या’ हे गाणं लिहिलं असावं. तो प्रसंग असा आहे... बुल्लेह गुरूच्या शोधात भटकत असतो. माळीकाम करणारा सुफी शाह इनायतच्या रूपाने त्याला गुरु भेटतो, मात्र शाह इनायत त्याची खूप परीक्षा घेतात. गुरुवरील प्रेम सिद्ध करण्यासाठी बुल्लेह एका गणिकेकडे नोकरीला राहतो. पडेल ते काम करतो. एकदा तिच्या अनुपस्थितीत मैफिलीत पायात घुंगरू बांधून नाचतोही. शेवटी गुरुच्या आठवणीत व्याकूळ होऊन त्यांच्या भेटीला येतो खरा पण गुरु काही केल्या दार उघडत नाहीत मग तो तल्लीन होऊन नाचायला लागतो आणि गुरूला उद्देशून म्हणतो, ‘सानू घायल करके फिर ख़बर न लेय्या... तेरे इश्क़ नचाया करके थय्या थय्या.’

सुफीं च्या गुरुप्रेमाची दोन उदाहरण जगप्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक जोड़ी म्हणजे दिल्लीचे आमिर खुसरो अणि त्यांचे गुरु निजामुद्दीन औलिया. दूसरी जोड़ी म्हणजे रूमी अणि त्याचा गुरु शम्स तबरेज. अनेक शास्त्रीय रागांचा आणि वाद्यांचा शोध लावणारा खुसरो पहिल्या गुरुभेटीविषयी आईला सांगताना म्हणतो, ‘आज रंग है री मा रंग है री, मोहे महबूब के घर रंग है री’. खुसरो आणि निजामुद्दीन यांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. गुरुला पिया (प्रेमी) संबोधत खुसरो म्हणतो,

‘अपनी छवि बनाई के मैं तो पी के पास गई

जब छवि देखी पीहू की सो अपनी भूल गई’

गुरुच्या निधनाची बातमी आली तेव्हा खुसरो दौऱ्यावर होता. तो धावत पळत निजामुद्दीन यांच्या खानकाहमध्ये (आश्रमामध्ये) आला. गुरूच्या शेवटच्या क्षणी आपण सोबत नव्हतो याचे अतीव दुख झाल्याने त्याने तोंडाला काळे फासले आणि त्याने या ओळी म्हटल्या, ‘गोरी सोवे सेज पर, मुख पर डारे केस

चल ख़ुसरो घर आपने सांझ भई चहुं देस’

यानंतर काही दिवसांनीच खुसरोनेही देहत्याग केला. निजामुद्दीननेही देह त्याग करताना सांगितले होते की खुसरोची कबर माझ्या शेजारीच असावी, आणि जो माझ्या दरगाहमध्ये दर्शनाला येईल त्याने आधी खुसरोच्या कबरीला सलाम करून यावा, तरच मी त्या भक्ताचा सलाम स्वीकारेन..

रुमी या प्रसिद्ध सुफी संताचे शम्स तब्रेजी या आपल्या गुरुवरील प्रेमही असेच उत्कट होते. रूमीच्या प्रेम कवितांचे चाहते जगभर विखुरले आहेत, तो आज युरोपातील सर्वांत लोकप्रिय आणि सर्वाधिक वाचला जाणारा प्रेम कवी आहे. दोघांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते इतके की ते दोघे समलैंगिक असल्याचा लोकांना भ्रम व्हायचा. आपल्या गुरूविषयी रुमीने अनेक कविता लिहिल्या, त्यापैकी एक कविता इम्तियाज अलीने त्याच्या रॉकस्टार या सिनेमात वापरली, ज्यात रुमी म्हणतो, ‘पता है , यहाँ से बहुत दूर, गलत और सही के पार, एक मैदान है.. मैं वहां मिलूंगा तुझे’

गुरुवरील प्रेमातून ईश्वरीप्रेम मिळवणारे सुफी अधिक असले तरी एक सुफी ईश्वरावरील प्रेम काव्याने अजरामर झाली ती म्हणजे ही बसरा या शहरात राहणारी पहिली महान स्त्री सुफी राबिया. तिने आपल्या प्रेम काव्यातून ईश्वराचे गुणगान तर केलेच पण देवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी त्याची पूजा करा म्हणणाऱ्या मौलवींचीही खिल्ली उडवली. ती ईश्वराला म्हणते, ‘नरकाग्नी वा स्वर्गसुख, मी दोहोंना जुमानत नाही. ते ईश्वरप्राप्तीतील अडथळे आहेत. शिक्षेच्या भीतीने वा स्वर्गाच्या लालसेने मी ईश्वराला पूजणार नाही, मी त्याची भक्ती करेन ती केवळ त्याच्यावरील प्रेमामुळेच.’

Post a Comment

 
Top