प. बंगालमध्ये निवडणुकीची चाहूल भिंतीवरून जाणवते. इतर राज्ये निवडणुकीच्या आधी फलक, पाेस्टरने रंगतात, तर पश्चिम बंगालमध्ये भिंतीवरील रंग उजळतात. येथील राजकीय संस्कृती व निवडणूक प्रचाराचा महत्त्वाचा भाग आहे - वॉल रायटिंग. मात्र, येथील भिंती पक्षाच्या घोषणा, निवडणूक चिन्हांपर्यंतच मर्यादित नाहीत, येथे वॉल रायटिंग अभिव्यक्तीचे एक माध्यम आहे. यामुळेच भाजपने ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करत ‘पीशी जाओ’ (आत्या तू जा) गाणे तयार केले आहे. त्याचा व्हिडिओही वॉल रायटिंगच्या अॅनिमेशनवर आहे. केवळ सोशल मीडियाच नव्हे, भिंतींवर तृणमूल व भाजपचे वर्चस्व दिसते. गेल्या निवडणुकीच्या उलट डावे यंदा गायब आहेत. विश्लेषक सांगतात की, बंगालचा मूड जाणून घ्यायचा असेल तर भिंतींवर लिहिलेल्या ओळींचे मर्म जाणून घेण्याचा प्रयत्न करा. बिगर भाजप पक्षांना माहिती आहे की, तृणमूलच्या विरोधाचा फायदा भाजपला होऊ शकतो. शक्यताे यामुळेच भिंती ममता विरुद्ध मोदी बिग फाइटसाठी सोडून दिल्या आहेत. राज्यात १९६९च्या आधी वॉल रायटिंगची परंपरा नव्हती.
१९७७ मध्ये ती प्रचलित झाली व तिला सांस्कृतिक अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून ओळख मिळाली. इंदिरा गांधींपासून ते ज्योती बसू व सिद्धार्थ शंकर राय यांच्यापर्यंत नेत्याचे कार्टून, ग्रॅफिटीच्या माध्यमातून घोषणा व ज्वलंत मुद्द्यांवर सशक्त वॉल रायटिंगचा भाग राहिला आहे. एकदा वीज संकट मुद्दा होता, तेव्हा ज्योती बसू यांच्या हातात कंदील देत लिहिले होते, ‘ज्योती एलो, ज्योती गेलो’... म्हणजे ज्योती (ज्योती बसू) आले, ज्योती (वीज) गेली. दुकानदार सांगतात की, वॉल रायटिंगमुळे चुना, रंगाच्या विक्रीत सुमारे ३०% वाढ झाली आहे. घाऊक दरात चुना, रंग विकत घेतल्यास ४-५ चौरस फूट वॉल रायटिंगसाठी २०- ३० रुपये खर्च येतो.
भिंत रंगवण्याआधी ती ताब्यात घेण्याची लढाई, पक्षांमध्ये संघर्षही होतो
निवडणुकीच्या खूप आधीच भिंती ताब्यात घेतल्या जातात. कार्यकर्ते गुपचूप भिंतींच्या चारही बाजूला रेषा आखून पक्षाचे नाव लिहून देतात. तेथे दुसरा पक्ष काही लिहू शकत नाही. जागा ताब्यात घेण्यावरून पक्षांमध्ये हाणामारीही होते. आयोगाच्या निर्बंधांमुळे शासकीय भिंती वाचतात, मात्र खासगी इमारतींच्या भिंतीवर निवडणूक चित्र नक्कीच रंगते.
Post a Comment