0

 

लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) पेंगाँग त्सो तलावाच्या उत्तर व दक्षिणेकडील आघाडीवर १० महिन्यांपासून समोरासमोर होणारी तैनाती आता संपुष्टात येऊ लागली आहे. मात्र आता व्यापक पातळीवर हा फौजफाटा माघारी घेण्यास चीनने सुरुवात केली आहे. भारतीय सैन्याने त्याची पुष्टी करताना चिनी रणगाडे व सैनिक माघारी जात असल्याचे व त्यांची बंकर आणि इतर पाडकामाची छायाचित्रे जाहीर केली आहेत. दक्षिण पेंगाँगच्या आघाडीवरून सुमारे २०० रणगाडे मागे घेण्यात आले आहेत. आता हे रणगाडे आधीच्या लोकेशनवर म्हणजेच शॅमडाँग व रुडोकीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दक्षिण दिशेने सुमारे ५० शिखरांवर भारतीय सैन्याने दक्षता म्हणून तैनाती केली होती. त्यामुळे पीएलएच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले होते. येथे मात मिळाल्याने चीनची व्यूहरचना व्यर्थ ठरली.

चर्चेदरम्यान भारताचे पारडे जड
दक्षिण पेंगाँगमधून माघार घेतल्यानंतर भारताचे पारडे जड राहील असे माजी लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनी म्हटले . अशा आघाड्यांवर भारतीय सैन्याची तैनाती कधीही होऊ शकते. चीनवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, हे मात्र खरे आहे. परंतु चर्चेच्या पातळीवर आपले पारडे जड राहील. सैन्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

शिखरांवर बनवल्या होत्या चौक्या, दक्षिणेकडील भागात वेळ लागणार
पेंगाँगच्या उत्तरेकडील शिखरावर पीएलएने लष्करी चौक्या बनवल्या आहेत. फिंगर-५ पासून एक जेट्टीदेखील बनवली होती. आता हे सर्व बंकर पाडून एप्रिल २०२० मधील स्थितीसारखे केले जात आहे. उत्तरेकडील आघाडीवरील बांधकामे पाडली जाऊ शकतात. परंतु दक्षिणेकडील बंकर पाडण्याची प्रक्रिया दीर्घ चालू शकते. कारण दोन्हीकडील सैन्याची येथे मोठी तैनाती होती.

उलट्यापावली माघार, आवराआवर
छायाचित्र पँगाँग त्सो तलावाच्या उत्तरेकडील भागाचे आहे. चिनी सैन्याचे रणगाडे धुळ उडवत तैनातीच्या जुन्या ठिकाणी परतू लागले आहेत. चीनने तयार केलेले बंकर जेसीबीने पाडली जात आहेत. यंत्रे पोहचू शकत नसलेल्या भागात पीएलए आपले सामान हाताने गोळा करून जुन्या ठिकाणी जात आहे.

देपसांग, हाॅट स्प्रिंग, गोगरामधील सैन्य हटवण्यासाठी कमांडरस्तरीय चर्चा
देपसांग, हॉट स्प्रिंग, गोगरामधील आमने-सामने सैन्याला माघारी घेण्याच्या पहिल्या टप्प्यानंतर कमांडरस्तरीय चर्चा होणार आहे. देपसांगमध्ये चिनी सैन्य १९ किलोमीटरवरील लष्करी छावणीवरून बोटल नेकपर्यंत येऊन तीन किमीवरील बर्त्सेपर्यंत घुसखोरी करत. त्यांची बेकायदा गस्त आता भारतीय सैन्याने रोखली आहे. मात्र चीनने भारतीय सैन्याचे पॉइंट १७ पर्यंतचे गस्त रोखली आहे.


Post a Comment

 
Top