विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत जाणीवपूर्वक अनिश्चितता निर्माण करून महाविकास आघाडी सरकार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शह देण्याच्या तयारीत आहे.
नाना पटोले यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागी नवा अध्यक्ष विधानसभेला निवडायचा आहे. अध्यक्षाची निवड शक्यतो बिनविरोध होते. १९९० मध्ये निवडणूक झाली होती. तेव्हा ती गुप्त मतदान पद्धतीने झाली होती. यासंदर्भात निवडणूक कधी घ्यायची हा सर्वस्वी मंत्रिमंडळाचा अधिकार आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत तारीख निश्चित होईल आणि ती राज्यपालांना कळवली जाईल, असे संसदीय कामकाज मंत्री अॅड. अनिल परब यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पहिल्या दिवशी होऊ शकते किंवा अर्थसंकल्पात अडचण नकाे म्हणून शेवटच्या दिवशी होऊ शकते तसेच पुढच्या अधिवेशनातही होऊ शकते, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितले. राज्यात आणखी गारपिटीची शक्यता व कोरोनाचा वाढता उद्रेक या पार्श्वभूमीवर आमदारांच्या उपस्थितीचा मोठा प्रश्न असल्याचे झिरवळ म्हणाले.
दरम्यान, राज्यपाल आपल्या अधिकारात विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख निश्चित करू शकतात, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला. मात्र तो सर्वस्वी मंत्रिमंडळाचा अधिकार आहे, असे उपाध्यक्ष झिरवळ यांनी सांगितले.
राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्च रोजी
विधिमंडळ अधिवेशन १ मार्चपासून सुरू होत आहे. ८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. कोरोनास्थिती लक्षात घेऊन १ मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा की घटवायचा याचा निर्णय होईल. २५ फेब्रुवारी रोजी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ मार्च नंतरच्या पुढील कामकाजाबाबत निर्णय होईल, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितले.

Post a Comment