हे आहेत राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यातील ५३ वर्षांचे दृष्टिहीन मदन गोपाळ मेनारिया. लोक त्यांना प्रेमाने हरिओम म्हणतात. अभ्यासात हुशार होते. मात्र, १९८० मध्ये टायफॉइड झाला. तेव्हा वैद्यकीय क्षेत्रही प्रगत नव्हते आणि ना शिक्षणाचेही क्षेत्रही. हरिओम बरे तर झाले मात्र दृष्टी गेली. तेव्हा ते नववीत शिकत होते. मोठे झाल्यावर भीक मागावी लागली. शिक्षण अपुरे राहिल्याचे दु:ख होते. यामुळे संकल्प केला की, आपल्या भागातील कोणत्या मुलाचे सुविधेअभावी शिक्षण राहू नये. मंदिरातून मिळवलेला पैसा ज्ञान मंदिरापर्यंत पोहोचवू लागले. भीक मागत त्यांना ३० वर्षे झाली आहेत. आतापर्यंत अनेक शासकीय शाळांमध्ये वर्गाचे बांधकाम, जलकुंभ बांधण्यासह सुमारे १० लाखांची विकासकामे केली आहेत. मुलांच्या शैक्षणिक साहित्याचाही खर्च करतात. भीक म्हणून मिळालेल्या पैशांतून आपल्या खाण्या- पिण्यावर कमी खर्च करून बाकीची रक्कम शाळांमध्ये दान करतात.
पाच वेळा सन्मान, राज्यपालांनीही गौरवले
हरिओमला त्यांच्या कामांसाठी पाच वेळा सन्मानित करण्यात आले आहे. २००३- ०४ मध्ये गुजरातचे तत्कालीन राज्यपाल नवल किशोर शर्मा यांनी सन्मानित केले. तर जिल्हा शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनीही सन्मान केला आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण चांगल्या कामात जावा, हाच त्यांचा आयुष्याचा उद्देश आहे.
शैक्षणिक साहित्यही पुरवतात
-खरसाण येथील उच्च माध्यमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक अंबालाल मेनारिया यांनी सांगितले की, हरिओमने शाळेत वर्ग बांधले, तसेच माइक सेट, जलकुंभ व इतर आवश्यक साहित्य पुरवले आहे.
-मावली डांगीयानच्या शाळा इमारतीत प्रवेशद्वारही बांधून दिले.
-पीईईओ किशन मेनारिया सांगतात की, खरसान गावातील चारभुजा मंदिराचे तोरणद्वार बाधंण्यासाठी हरिओम यांनी पाच लाख रुपये दिले आहेत.
मिळालेले सर्व पैसे करतात दान
परिसरात शिक्षणासाठी झटणारे हरिओम मंदिरांबाहेर भीक म्हणून मिळालेले सगळे पैसे दान करतात. जगदीश मंदिराचे हेमेंद्र पुजारी सांगतात की, मदन गाेपाळ अनेक वर्षांपासून एकादशीच्या दिवशी मंदिराबाहेर बसतात. यावेळी मंदिरात येणारे भाविक श्रद्धेने त्यांना दान देतात. दर सोमवारी एकलिंगजी मंदिराबाहेरही दिसतात. आपल्या बालपणाबाबत हरिओम सांगतात की, वडील छगनलाल मेनारिया २० वर्षांपूर्वी बँक अकाउंटंट पदावरून निवृत्त झाले, आई गृहिणी होती. भाऊ छायाचित्रकार आहे. मी शिकू शकलो नसलो तरी आपल्या भागातील कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, असे हरिओम सांगतात.

Post a Comment