0

 नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या काँग्रेसच्या कोट्यातील विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील. काँग्रेसने कुठेही राष्ट्रवादीच्या कोट्यातील उपमुख्यमंत्री पदावर दावा केला नसल्याचा खुलासा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. हा विषयच मुळात कुठून जन्मास आला हेच मला कळत नसल्याचे स्पष्ट करून आगामी विधानसभा अधिवेशनात काँग्रेसचाच अध्यक्ष निवडला जाईल, अशी माहिती थोरात यांनी दिली आहे.

नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर आघाडी सरकारमध्ये आणखी एक उपमुख्यमंत्रिपद निर्माण केले जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील उपमुख्यमंत्रिपदावर दावा केल्याच्याही वावड्या उठल्या होत्या. तसेच शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद देण्याचीही चर्चा होती. शनिवारी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा विषय आला कुठून याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होईल, या विषयात तथ्य नसल्याचे सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. इंधन दरवाढीवरून भाजप सरकारवर सडकून टीका केली. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळेच इंधन दरवाढीचा भडका उडाल्याचा आरोप थोरातांनी केला.

Post a Comment

 
Top