0

 प्रतिक पुरी लिखित, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत गीतचरित्र, ‘युग नायक शिवराय’, यातील ‘शिव-वंदना’ या गीताचा लोकार्पण सोहळा नुक्ताच पार पडला. त्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलेले हे मनोगत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जनमानसावर प्रदीर्घ काळ राज्य करणारा हा जगातील एकमेव राजा आहे. आजही हजारो मराठी तरुणांना ‘शिवरायांचा मावळा’ संबोधून घेण्यात धन्यता वाटते. त्याला कारण आहे या माणसाचे अद्भूत कर्तृत्व आणि त्याहून थोर व श्रेष्ठ असे चारित्र्य. छत्रपतींची ही श्रेष्ठता केवळ महाराष्ट्रालाच नाही तर भारताला आणि जगालाही मोह घालते आहे. एक व्यक्ति व लेखक म्हणून मी देखील याला अपवादी नाही. त्यामुळेच शिवाजी राजांविषयी काहीतरी लिहून त्यांच्या ऋणांतून अंशतः तरी मुक्त व्हावे ही इच्छा मनात प्रबळ होत होती. त्यांतूनच ‘युग नायक शिवराय’ ही गीतकृती जन्माला आली.

महाराजांच्या जन्मापासून ते देहावसनापर्यंतच्या त्यांच्या अमोघ अद्वितीय कर्तृत्वाचा वेध यात घेतलेला आहे. कवी भूषण यांचे ‘शिवभूषण’, म. म. कुंटे यांचे ‘राजा शिवाजी’ व कवी यशवंत यांचे ‘शिवराय’ हे खंडकाव्य, कवी मुबारक शेख यांचा ‘शिवनामा’ हा काव्यसंग्रह, तसेच कवी कुसुमाग्रज व गुरु रोबिंद्रनाथ ठाकूर यांनी व इतर अनेकांनी महाराजांच्या जीवनावर आधारीत गीते कविता यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली आहे. परंतू त्यांच्या समग्र जीवनाचा गीतांमधून आढावा घेणारी ‘युग नायक शिवराय’ ही पहिलीच गीतकृती आहे. शिवाय ती हिंदी भाषेत आहे. देशभरात महाराजांच्या संपूर्ण जीवनाचा परिचय व्हावा ही भावना त्यामागे होती. या शिव गाथेत अनेक उल्लेखनिय गोष्टी आहेत. हिंदीत प्रथमच दोन पोवाडे मी लिहिले आहेत. एक तानाजी मालुसरे यांच्या बलिदानावरचा आहे. दुसरा अफजलखान वधावर आधारीत आहे, जो या शिव गाथेचा उत्कर्ष बिंदू आहे.

मावला शिवा का गाये, किर्ती दुहराये, छाती भर आये। ऐसी थी करनी शिवबा की जी जी जी जी ।। सह्याद्री हमे बतलाये, शिवा की कथाये, भूली ना जाये। ऐसी थी वीरता शिवबा की जी जी जी जी ।।

जिजामाता यांच्या प्रेरणेमुळे महाराजांनी, गुलामीच्या अंधःकारातून स्वराज्याचा स्वातंत्र्याचा सूर्य तळपता ठेवण्याचा महिमा साध्य केला. ही अद्वितीय आई आपल्या मुलाला झोपवण्यासाठी अंगाई गाणार नाही तर त्याला खऱ्या अर्थाने जागं करण्यासाठी गाईल असं मला वाटलं. त्यांतूनच, रामलला तू मेरा कन्हैय्या, गाती है तुझको लोरी ये मैय्या। आस बडी लेके थामी है बैंय्या, बनना है तुझको सबका खिवैय्या। सोना ना भूलना ना तुझको कसम है।। ही अंगाई निर्माण झाली. शिवाजी हे नावच असे आहे की त्याच्यासमोर आपोआप आपले मन-मस्तक आदराने अभिमानाने झुकते. त्यांतूनच महाराजांची वंदना साकार झाली आहे. निर्दय निष्ठूर काल कठीण था, तन मन धन सब पराधीन था। लढने स्वधर्म की रक्षा करने, एक शिवा ही खडा था। युग नायक शिवराय जय जय युग नायक शिवराय ।। महाराजांचे चारित्र्य वादातित आहे. त्यांनी स्त्रियांचा कायम आदर केला. बाईची बेईज्जिती करणाऱ्यांचा त्यांनी चौरंगा (हात-पाय छाटले) केला आणि बलात्काऱ्यांवर जरब बसवली. नारी पे जो हाथ उठेंगे, काट दिये जायेंगे यही थी छत्रपती की नीति।। महाराजांचे गुणवर्णन करणारी अनेक गीते ‘युग नायक शिवराय’ मध्ये आहे जी सर्वांना प्रेरक ठरतील. जन जन के मन में जो बसता, शासक वही महान है। कर्म को अपने धर्म जो माने, लोगों का अभिमान है।। नही शिव का था कोई सानी, औरंग ने भी बात ये मानी। हम यूँ ही नही अभिमानी, गाये गर्व से शिव की कहानी।।

राजा म्हणून, व्यक्ति म्हणून हा माणूस कसा होता याचंही गुणवर्णन यात आहे. दूर दृष्टी दृढ धर्मी नायक, उद्योगी शिवराज। स्थिरमना एक लक्ष्यी साधक, चीरकर्मी शिवराज।। शिवाजी महाराज यांचे सर्व जीवन क्रांतिकारी जगण्याचा मापदंड आहे. सामान्य माणसाला प्रेरीत करणारा, त्याचा उर अभिमानाने भरून टाकणारा असा राजा पुन्हा होणेच अशक्य. ते केवळ गो-ब्राह्मण प्रतिपालक नव्हते. त्यांचे समस्त रयतेवर, हत्ती घोडे, गडांवरही प्रेम होते. त्यामुळेच त्यांच्या या कर्तृत्त्वाला साजेशी अशी नवीन घोषणा यात आहे. लवकरच ‘युग नायक शिवराय’ आपल्या भेटीस येणार आहेत. याचे संगीत दिग्दर्शन, मयुर मुळे यांनी केले आहे. सुरेश देशमुख (निळू फुले कला अकादमी) व राहुल लामखडे (ऑरोरा प्रॉडक्शन) यांनी निर्मिती केली आहे. आपण सर्व प्रेमाने या शिवगाथेचे स्वागत कराल या अपेक्षेसह व महाराजांना त्रिवार मुजरा करून त्यांच्यासाठी लिहिलेल्या घोषणेने या मनोगताची सांगता करतो. सकलहिंदवी स्वराज्यकुलगौरव क्षत्रियशिरोमणी शस्त्रशास्त्रपारंगत वीररणधुरंधर राजनीतिकुशल प्रजाहीतरक्षक बहुजनप्रतिपालक अश्वपतीगजपतीगडपतीचतुरंगसेनापती छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय !



Post a Comment

 
Top