0

 


राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यांतील ज्या भागात रुग्णसंख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजयकुमार यांनी गुरुवारी या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

मुंबई महानगरपालिकेने नियम कठोर केले असून घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारण्यात येणार आहेत. एखाद्या इमारतीत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येईल.

राज्यात गुरुवारी ५ हजार ४२७ कोरोना रुग्ण नव्याने आढळले, तर ३८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण ४० हजार ८५८ रुग्ण ॲक्टिव्ह असून दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या अवघी २ हजार ५४३ आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुका, अमरावती महापालिका क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद आणि पांढरकवढा नगर परिषद क्षेत्र आणि अकोला जिल्ह्यातील अकोट व मूर्तिजापूर तालुका आणि अकोला महापालिका क्षेत्र या भागामध्ये रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली होती. या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहेत.

आरोग्यमंत्री टोपे, जयंत पाटील, खडसे यांना कोरोनाची लागण
आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि स्नुषा तथा रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खडसे यांना तिसऱ्यांदा कोरोना संसर्ग झाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदर्श : गर्दी नकाे म्हणून मुलीचे लग्न साधेपणाने
औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मुलीचा विवाह २६ फेब्रुवारी राेजी शहरातील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये नियाेजित हाेता. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनीही हा साेहळा, रिसेप्शन रद्द करून घरगुती पातळीवर मुलीचा विवाह करण्याचे ठरवले आहे. काेराेना राेखण्यासाठी लाेकांनी नियम पाळलेच पाहिजेत. अन्यथा आधी रात्रीची व नंतर दिवसाही संचारबंदी लावण्याची वेळ येईल, असा इशारा पाेलिस आयुक्तांनी दिला आहे.

मराठवाड्यात ४१३ रुग्ण वाढले, ७ मृत्यू, १६९ कोरोनामुक्त
औरंगाबाद | मराठवाड्यात गुरुवारी ४१३ नवे रुग्ण सापडले. ७ मृत्यू झाले. लातूर ४ तर जालना, नांदेड, उस्मानाबाद येथे एकाचा मृत्यू झाला. नवे रुग्ण : औरंगाबाद : १५६, जालना : ४८, परभणी :४१, हिंगोली :१३, नांदेड : ५८, लातूर :३५, उस्मानाबाद : २५, बीड : ३७.

अशा दिल्या सूचना : {सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये काँटॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे. { एका रुग्णामागे किमान २० ते ३० निकट सहवासितांची तपासणी, चाचण्या वाढवा. { पॉझिटिव्हिटी दर ३२ ते ४० टक्क्यांवरून १० टक्क्यांपेक्षा खाली आणावा.



Post a Comment

 
Top