नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी’ ही ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांची कविता भारतीय हवामानाचे अचूक वर्णन करणारी आहे. ‘लहरी’ हा शब्द भारतीय हवामानासाठी चपखल आहे. सध्या महाराष्ट्र या लहरीपणाचा अनुभव घेतो आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने राज्यातील रब्बी हंगामाचे तीनतेरा वाजवले आहेत. बदलत्या हवामानाचे हे स्पष्ट संकेत आहेत. सरलेल्या दशकावर नजर टाकली तर याचे प्रत्यंतर येते. मागील दशकात जवळपास दरवर्षी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका राज्याला बसला आहे. शिवाय, ऋतुचक्राचे लांबणे, मान्सूनच्या पावसात मोठे खंड, कमी अवधीत मुसळधार पाऊस, थंडीची लाट, सातत्याने वाढते तापमान हे बदलाचे संकेत आहेत. नुकतेच सरलेले २०२० हे वर्ष बदलत्या हवामानाचे ताजे उदाहरण. वर्षातील प्रत्येक महिन्यात पाऊस आणि त्याच वेळी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण वर्ष अशी २०२० ची ओळख झाली आहे.
याच वर्षीचा पावसाळा नोव्हेंबरपर्यंत लांबला आणि हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम असाच पावसात वाहून गेला होता. रब्बी पिकांच्या वाढीच्या काळात तापमानात होणारे चढ-उतार उतारा कमी करणारे ठरणार आहेत. त्यातच अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा राज्याला बसला आहे. कोरोनामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था रुळावर येत आहे असे वाटत असतानाच हा तडाखा बसल्याने त्याचा अर्थचक्रावर परिणाम होणार आहे. आता पंचनामे - नुकसानभरपाई हे सारे सोपस्कार होतीलच, मात्र हवामान बदल हा विषय गांभीर्याने घेण्याची वेळ आलेली आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेतीला बसतो. शेतीवरच राज्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे या संबंधाचा विचार करून पुढील पावले उचलणे गरजेचे आहे. हवामान, तापमानातील बदल, पाण्याचा ताण सहनशील पिकांचे वाण तयार करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नव्या तंत्राच्या साहाय्याने अशा नैसर्गिक आपत्तींचे अचूक अंदाज वेळेवर मिळणारी व्यवस्था रुजवणे काळाची गरज बनली आहे. हे केले नाही तर होणारे ‘तीनतेरा’ उघड्या डोळ्याने पाहणे एवढेच आपल्या हाती राहील.
Post a Comment