पूर्व लडाखमधील तणावाच्या ठिकाणांवरून चीनने माघार घेतल्यानंतर आता पाकिस्ताननेही असेच ठरवल्याचे दिसते. भारत-पाकिस्तान यांच्यात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमआे) स्तरीय बैठक झाली. उभय देशांतील सर्व जुन्या करारांची पुन्हा अंमलबजावणी केली जाईल, याबाबत चर्चेत सहमती दर्शवण्यात आली. २४ व २५ फेब्रुवारीच्या रात्रीपासूनच हे लागू होणार आहे. हाॅटलाइनवर या चर्चेत युद्धबंदी, युद्धबंदीचे उल्लंघन, काश्मीर मुद्द्यांसह इतर करारांवरदेखील चर्चा झाली. दोन्ही देशांत लाइन ऑफ कंट्रोल (एलआेसी) येथील स्थितीचाही आढावा घेतला . त्यानंतर दोन्ही देशांनी गुरुवारी संयुक्त पत्रक जारी करून नियंत्रण रेषेवर शांतता नांदावी यासाठी कटिबद्धता दर्शवली. काही महिन्यांत संबंध सामान्य करण्याच्या दिशेने आणखी काही पावले उचलली जाऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारत व पाकिस्तान यांच्यात नोव्हेंबर २००३ मध्ये गोळीबार न करण्याचा करार झाला होता. तीन वर्षे २००६ पर्यंत त्याचे पालन झाले.
सैन्याने प्रत्युत्तर दिल्याने पाक वठणीवर : मेजर जनरल(निवृत्त) पीके चक्रवर्ती, संरक्षणतज्ज्ञ. डीजीएमआे स्तरावरील चर्चेसाठी एलआेसीबाबतचा करार माझ्या कार्यकाळात झाला होता. २००३ मधील ही गोष्ट आहे. कारगिलनंतर आम्ही त्यास साेडले नाही. तेव्हा पाकिस्तानला स्वत:च्या बचावासाठी आपल्याशी करार करावा लागला. काही दिवस त्याचे पालन केल्यानंतर युद्धबंदीचे उल्लंघन सुरू झाले. आता डीजीएमओ स्तरावरील चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. त्यामागील स्थिती लक्षात घ्यायला हवी. पाकिस्तान चार गोष्टींमुळे जिवंत आहे. पहिली- इस्लामिक कट्टरवाद, दुसरी- लष्करी वर्चस्व, तिसरी-अमेरिका-चीनसारख्या देशांचे समर्थन, चौथी-भारताशी शत्रुत्व. पाकिस्तानने भारताशी शत्रुत्व सोडल्यास तो देश संपून जाईल. पाकिस्तानला सुधारायचे आहे, हे म्हणणे बेइमानीचे ठरेल. भारतीय सैन्य सडेतोड उत्तर हेच सध्याच्या चर्चेमागील कारण आहे. पाकला स्वत:चा बचाव करायचा आहे. आम्हाला भारतासोबत चर्चा करण्याची इच्छा आहे, असे पंतप्रधान इम्रान खान यांनी श्रीलंका दौऱ्यात म्हटले.म्हणूनच पाक काही वेळ चर्चेची अंमलबजावणी करेल आणि पुन्हा घुसखोरी करेल.
संयुक्त वक्तव्य: संबंध सुधारण्यासाठी तीन मुद्द्यांवर भर
1. हॉटलाइनद्वारे यंत्रणा तयार केली जाणार आहे. त्यानुसार वेळोवेळी उभय देशांत चर्चा होऊ शकेल.
2. युद्धबंदी, गोळीबार, घुसखोरीसह इतर प्रकरणांची चर्चेद्वारे सोडवणूक केली जाईल.
3. नियमित फ्लॅग मीटिंगला सुरुवात होणार. यातून उभय देशांतील गैरसमज दूर होतील.
३ वर्षांत १०,७५२ वेळा युद्धबंदी उल्लंघन, ७२ जवान शहीद
- पाकिस्तानने तीन वर्षांत २०१८ पासून २०२० दरम्यान १०,७५२ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले. या घटनांत सुरक्षा दलाचे ७२ जवान शहीद झाले, तर ७० नागरिकांचा मृत्यू झाला.
- युद्धबंदीचे उल्लंघन प्रकरणात पाकने २०२० मध्ये १७ वर्षांचा विक्रम मोडीत काढला. तेव्हा पाकने ४१०० वेळा गोळीबार केला. २०१९ मध्ये पाकने ३२३३ वेळा, २०१८ मध्ये ३००० वेळा उल्लंघन केले होेते.
Post a Comment