0

 मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी “मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली. गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना यापुढे परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारेही मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अमरावती, अचलपूर शहरांमध्ये सोमवारी रात्रीपासून लाॅकडाऊन, तर नाशिक आणि पुणे शहरात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून संबोधित केले. संसर्ग रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, जिथे जिथे आवश्यकता असेल तिथल्या जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश आपण दिले आहेत. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे त्यांनी मास्क घालू नये आणि आरोग्याची कुठलीही शिस्त पळू नये, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील ८ दिवसांत जनतेने करायचा आहे, असे सांगितले.

... पण दुसरा पर्याय तरी कुठाय : यशाेमती ठाकूर
अमरावती | अमरावती मनपासह अचलपूर नगरपालिका क्षेत्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू करताना मलाही वाईट वाटते. परंतु दुसरा पर्याय तरी कुठाय? या शब्दांत जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी रविवारी आपली हतबलता व्यक्त केली. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सोमवारी रात्री ८ वाजेपासून या दोन्ही शहरात आठवडाभरासाठीचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या बंददरम्यान सर्वांनी नियम मोडल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही ठाकूर यांनी सांगितले.

पुण्यात शाळा, काॅलेज २८ फेब्रुवारीपर्यंत बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे आणि नाशिक शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार असून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मर्यादित स्वरूपाची संचारबंदी असेल, तर नाशिक शहरातही सोमवारपासून आठवडाभर रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. शहरातील शाळा-महाविद्यालये सुरूच राहणार आहेत.

कार्यालयाच्या वेळा बदलणार
पंतप्रधानांसमवेत नीती आयोगाच्या बैठकीत आपण कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत धोरण असावे याचा पुनरुच्चार करून शक्य असेल त्यांनी घरूनच काम करावे,असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईतील कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याची शक्यता आहे.

भाजपला टोला
पाश्चिमात्य देशांत कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे मोठे निर्बंध टाकण्यात आले आहेत. आपल्याकडेही सर्व काही खुले करा म्हणून नियम मोडून आंदोलने करणारे आता संसर्ग पसरतोय तेव्हा वाचवायला येणार नाहीत, असे सांगून आंदोलने करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला.

मुलाचा स्वागत सोहळा रद्द, ऊर्जामंत्र्यांचे अभिनंदन : सामाजिक जबाबदारी ठेवून वागणे महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा विवाहाचा स्वागत सोहळा रद्द करून भान ठेवले यासाठी त्यांचे अभिनंदन केले.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालये, सभागृहे, हाॅटेल्सवर कडक कारवाई
‘मी जबाबदार’ मोहीम : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी झाली. आता आपण सर्व काही खुले केले आहे. त्यामुळे मास्क घालणे, हात सतत धूत राहणे ही व्यक्तिगत जबाबदारी असून ती सर्वांनी पार पाडण्यासाठी “मी जबाबदार” मोहीम सुरू करीत आहोत,असे ठाकरे म्हणाले.



Post a Comment

 
Top