0

 कोरोनाच्या आडून आघाडी सरकार अधिवेशनापासून म्हणजेच जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला.

कायदा-सुव्यवस्थेचे, शेतकऱ्यांचे राज्यात अनेक प्रश्न आहेत. म्हणून आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केली, पण सरकार कायद्यात न बसणारे अल्पकाळाचे अधिवेशन घेत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. विधिमंडळात गुरुवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. बैठकीनंतर बोलताना फडणवीस म्हणाले, कोरोनामुळे पूर्ण अधिवेशन घेता येत नसेल तर आता लेखानुदान घ्या आणि नंतर पूर्ण अधिवेशन घ्या, अशी मागणी आम्ही केली. पण कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनासाठी तयार नाही. इथे कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरू आहेत. मग, नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का, असा सवाल फडणवीस यांनी केला. १० दिवसांचे अधिवेशन म्हणजे सरकारचा अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचे नाटक सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले. वनमंत्री संजय राठोड प्रकरण असो की वीज तोडण्याचे असो, विरोधी पक्ष अधिवेशनात आक्रमक राहील. भ्रष्टाचार उघडा पडण्याच्या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

कायद्याचे राज्य काहे कुठे?
महाविकास आघाडी सरकार म्हणजे बनाना रिपब्लीक आहे. इथे कायद्याचे राज्य उरले नाही. सत्ताधारी तिन्ही पक्षाच्या आशिर्वादेने सर्व काही चालु आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सरकारातले कोणीही नाराज नाही. याप्रकरणी पोलीसांवर दबाव आहे. पुरावे असून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंदवला जात नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.Post a Comment

 
Top