0

 



कोरोनाकाळानंतर चित्रपटगृहांत जाऊन चित्रपट पाहण्यास उत्सुक प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. सुमारे ८ महिन्यांनंतर सिनेमागृह चालकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यांना सलमानच्या ‘राधे’, अक्षयकुमारच्या ‘सूर्यवंशी’ व रणवीरच्या ‘८३’च्या प्रदर्शनातून कमाईची आशा होती. मात्र रिलायन्स एंटरटेनमेंटने कमाईत हिस्सेदारी वाढवण्याबाबत ठेवलेल्या अटींमुळे सिनेमागृह चालकांनी चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला. सध्या चर्चा व वाटाघाटी सुरू आहेत.

‘सूर्यवंशी’ व ‘८३’च्या कमाईत अधिक वाटा मागितल्याच्या प्रकरणात रिलायन्स एंटरटेनमेंटने म्हटले की, पहिल्या आठवड्यातील कमाईत ६५%, दुसऱ्यात ६०% व तिसऱ्या आठवड्यातील कमाईचा ५५% वाटा घेऊ. उर्वरित हिस्सा वितरक व सिनेमागृहे किंवा मल्टिप्लेक्स वाटून घेतील. मल्टिप्लेक्ससोबत चर्चांचे सत्र सुरू आहे. मात्र सिनेमागृह मालकांनी हे चित्रपट घेण्यास नकार दिला आहे. आम्हीही चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी खूप वाट पाहिली आहे. यामुळे कमाईत आमचा वाटा जास्त असेल, असा युक्तिवाद रिलायन्सने केला आहे. वांद्र्याच्या मराठा मंदिर थिएटरचे एमडी मनोज देसाई म्हणाले, ‘आजच सरकारचे पत्र आले आहे. त्यानुसार हंगामी कामगारांचे २११ रुपये वाढवायचे आहेत. महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊनच्या चर्चा आहेत. ८ महिन्यांपासून सिनेमागृहे बंद आहेत. आता कंपनी म्हणतेय की कमाईत त्यांचा वाटा २०% पेक्षा जास्त असेल. आधी तो ४५%, ४०% व ३५% असायचा. आमच्यासारख्या अनेक टॉकीज मालकांनी हे चित्रपट घेण्यास नकार दिला आहे.’ दिल्लीच्या डिलाइटचे मालक राजकार मल्होत्रा म्हणाले, चर्चा सुरू असून अजून काहीही ठरलेले नाही. महाराष्ट्रात अद्याप संपूर्ण क्षमतेने सिनेमागृहे उघडण्याची परवानगी नाही. देशात सर्वाधिक महसूल महाराष्ट्र सर्कलमधूनच येतो. ‘राधे’, ‘सूर्यवंशी’ व ‘८३’ हे व्यावसायिक मनोरंजक चित्रपट आहेत. त्यातून सिनेमागृहे व मल्टिप्लेक्सला बऱ्यापैकी कमाईची आशा होती.

हेच करायचे होते तर ओटीटीवर प्रदर्शित का करत नाही : मल्टिप्लेक्स
एका मल्टिप्लेक्सचा अधिकारी म्हणाला, कुणीही स्पष्ट बोलत नाही आहे. अशी अडवणूक करायची होती तर चित्रपट आधीच ओटीटीवर प्रदर्शित करून टाकायचे होते. आम्ही मल्टिप्लेक्स सिनेेमागृहांनीही या चित्रपटांची खूप प्रतीक्षा केली आहे. २% ते ५% हिस्सेदारीवर प्रकरण संपवायचे असते.कारण आम्हीही याच चित्रपटाच्या भरोशावर होतो. साऊथ व बंगालमध्ये सर्व ठीक आहे. हिंदीत बॉलीवूड पूर्णपणे ब्लॅकमेल करत आहे.’ ईदला १३ मे रोजी राधे, सूर्यवंशी २ एप्रिल व ‘८३’ ४ वा ११ जूनला प्रदर्शित होऊ शकतो.

Post a Comment

 
Top