0

 

राज्यात दिवसेंदिवस कोरोना पुन्हा उग्र रूप धारण करीत असून शनिवारी ६ हजारांवर नवे रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कर्नाटक सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पुन्हा नाकेबंदी सुरू केली आहे. महाराष्ट्रातून ये-जा करणाऱ्या सर्व वाहनधारकांना चेक पोस्टवरून तपासणी करून पुढे सोडले जात आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते म्हणाले, साधारणत: सायंकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत हा नाइट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू आहे. यानंतरही लोकांनी काळजी घेतली नाही तर राज्यात पुन्हा लाॅकडाऊन करावे लागेल. त्याशिवाय पर्याय राहणार नाही. संपूर्ण राज्यभर एकदमच रात्रीची संचारबंदी लावण्यात येणार नाही. यासंबंधीचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. स्थानिक परिस्थिती पाहून ते निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

कार्यालयीन वेळांचे नियोजन, धोरण आखावे : उद्धव ठाकरे
कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीती आयोगाच्या बैठकीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती.


Post a Comment

 
Top