0

 


सकाळी सहाची वेळ. आताशी उजाडू लागलं होतं. ते बहीण-भाऊ शाळेत जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले. काही अंतरावर झुडपातून बिबट्याने दुचाकीच्या दिशेने झेप घेतली. यश अशोक वाजे गाडी चालवत होता. त्याच्या पोटरीत चार दात घुसले. झटकून त्याने बिबट्याच्या जबड्यातून पाय सोडवला खरा, मात्र बिबट्याने चवताळून पुन्हा हल्ला केला. या वेळी दुचाकीवर मागे बसलेली तृप्ती रवींद्र तांबे (१७) हिच्या पाठीवर असलेल्या दप्तराच्या बॅगमध्ये बिबट्याचे दात अडकले. बिबट्या तिला खेचू लागला. यश एका हाताने दुचाकी चालवत दुसऱ्या हाताने तिला ओढून धरू लागला. ५० मीटर जीवन-मृत्यूची ही शर्यत चालली.

काळजाचा ठोका चुकवणारा हा थरार तृप्ती सांगत होती तेव्हा तिच्या अंगावर काटा उभा राहत होता. जेव्हा बॅग फाटली तेव्हाच तृप्तीची सुटका झाली. यात तिच्या कमरेला व मांडीला बिबट्याने पंजे मारल्याने जखमा झाल्या आहेत. बॅग तुटल्याने बिबट्याच्या तावडीतून दोघांची सुटका झाली तरी बिबट्या २०० मीटर अंतरापर्यंत दुचाकीचा पाठलाग करत होता. दुचाकी थांबली ती थेट गावातच. भगूर येथील नूतन विद्या मंदिरात तृप्ती अकरावीत शिक्षण घेते. ती पांढुर्ली येथे मामा अशोक वाजे यांच्याकडे राहते.

Post a Comment

 
Top