टूलकिट प्रकरणात अटकेतील पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीच्या जामीन अर्जावर शनिवारी दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीशांनी पोलिसांना विचारले, जर मंदिराच्या देणगीसाठी एखाद्या चोरट्याशी संपर्क केला तर मीही चोरीतही सहभागी होतो, असे कसे म्हणता येईल? दिशाचे वकील म्हणाले, येथे एखादा आंदोलन करत असेल व तुम्ही त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत असाल तर तो देशद्रोह कसा? असे असेल तर माझी हरकत नाही. आम्ही सर्व देशद्रोही आहोत आणि सर्व तुरुंगात जातो. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी २३ फेब्रुवारीपर्यंत आदेश राखून ठेवला. त्यांनी दिल्ली पोलिसांच्या वकिलाला सांगितले, समजा मी एका आंदोलनाशी संबंधित आहे. मी काही लोकांशी विशिष्ट हेतूसाठी भेटतो, तर तुम्ही माझ्याबाबत एकच विचार कसा ठेवाल? तसेच रवीला कोणत्या कलमान्वये अटक केली, असा प्रश्नही विचारला.
कोर्ट रूम लाइव्ह (सुनावणीतील काही भाग)
काेर्ट : टूलकिटचा संबंध २६ जानेवारीच्या हिंसाचाराशी असल्याचे काय पुरावे आहेत?
पोलिस : जर एखादा खलिस्तानी समर्थक काही तरी लिहून हिंसाचाराची योजना आखतो आणि नंतर तसेच होते तेव्हा शंका येणारच. सध्या चाैकशी सुरू आहे.
वकील (दिशा रवी) : माझी अशील २२ वर्षांची मुलगी आहे, जी बंगळुरूत राहते. तिचा खलिस्तान चळवळीशी कधीच संबंध आलेला नाही. अभियोजनचा खटला आहे की, खलिस्तान चळवळवाले शेतकरी आंदोलनाच्या आडून आपला हेतू साध्य करण्याच्या प्रयत्नात आहेत. लाल किल्ला हिंसाचारात दिल्ली पोलिसांनी १४९ जणांना अटक केली आहे. त्यातील एखाद्याने तरी टूलकिट वाचले असल्याचे सांगितले का? किंवा ते वाचल्यानंतर त्याला संताप आला? आणि त्याने प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला किंवा हिंसाचार केला? टूलकिट आक्षेपार्ह आहे का, हा प्रश्न आहे. एखाद्या महत्त्वाच्या प्रकरणात एखाद्याशी बोलणे गुन्हा नाही. एखाद्याशी आम्ही बोलतोय आणि तो देशविरोधी असेल तर त्याची शिक्षा मला का? एखाद्या देशविरोधी व्यक्तीशी बोलल्याने आपणही तसेच होऊ? आपले मत एखाद्या प्लॅटफॉर्मवर मांडणे गुन्हा नाही. एखाद्या आंदोलनाबाबत आपली आवड-नावड असू शकते. न आवडण्याचा अर्थ असा नाही की आपण देशद्रोही झालो.
Post a Comment