0

 

मिर्झापूर' या वेब सीरिजचे लेखक पुनीत कृष्णा (पहिला सीझन), विनीत कृष्णा (दुसरा सीझन) आणि दिग्दर्शक करण अंशुमन, गुरमीत सिंग यांना अलाहाबाद हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार कोर्टाने त्यांच्या अटकेवर अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायामूर्ती प्रीतीकर दिवाकर आणि न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकार आणि तक्रारदारालाही नोटीस बजावून उत्तर द्यायला सांगितले आहे.

17 जानेवारी रोजी दाखल झाला होता एफआयआर
17 जानेवारी रोजी मिर्झापूर जिल्ह्यातील चिलबिलिया येथे राहणारे अरविंद चतुर्वेदी यांनी वेब सीरिजविरूद्ध तक्रार दाखल केली होती. 'मिर्झापूर'मध्ये आक्षेपार्ह मजकूर आणि अवैध संबंधांचे चित्रीकरण आहे. सोबतच उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांची प्रतिमा डागाळली गेली आहे, असे चतुर्वेदी यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.

तक्रारीच्या आधारे करण अंशुमन, गुरमीत सिंग, पुनीत कृष्णा, विनीत कृष्णा यांच्याविरोधात 295-A,504,505,34,67A अंतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस स्टेशन प्रभारी विजय कुमार चौरसिया यांच्या नेतृत्वात तीन सदस्यांची टीम चौकशीसाठी मुंबई येथे दाखल झाली होती.

मेकर्स उच्च न्यायालयात पोहोचले होते

एफआयआरच्या विरोधात मिर्झापूरच्या निर्मात्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी म्हटले होते की त्यांची वेब सीरिज काल्पनिक आहे आणि प्रत्येक भागाच्या पूर्वी डिस्क्लेमरमध्ये हे स्पष्ट अधोरेखित केले गेले होते. आपल्याविरूद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करावा आणि या प्रकरणातील पुढील कारवाई थांबवावी अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली होती.

याआधी देखील झाली होती तक्रार
मिर्झापूरच्या खासदार आणि अपना दलच्या राष्ट्रीय अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांनीदेखील या वेब सीरिजच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. 2020 मध्ये वेब सीरिजचा दुसरा सीझन रिलीज झाल्यानंतर पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सीरिजविरोधात चौकशी करण्याची मागणी केली होती. या वेब सीरिजच्या माध्यमातून मिर्झापूरमध्ये गुन्हेगारी वाढलेली दाखवून, इथली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अनुप्रिया यांनी केला होता.

Post a Comment

 
Top