0

 पाच महिन्यांची तिरा कामत स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफीने (एसएमए) ग्रस्त आहे. या न्यूरो मस्क्युलर डिसऑर्डरपासून तिराला वाचवण्यासाठी सोमवारी १६ कोटी रुपयांचे झोलजेन्समा इंजेक्शन अमेरिकेहून भारतात येत आहे. दोन दिवसांत ते तिराला टोचले जाईल. यामुळे तिला नवे आयुष्य मिळण्याची आशा आहे. उपचार करत असलेल्या डॉक्टरांनुसार डोस दिल्याच्या महिनाभरानंतर तिच्यावर प्रभाव दिसू लागेल. अखेर हे इंजेक्शन इतके महाग का आहे याचा हा वृत्तांत...

हे इंजेक्शन कोणत्या आजाराचे आहे?
दोन वर्षांपेक्षा लहान मुलांवरील उपचारांत झोलजेन्समा इंजेक्शनचा वापर केला जातो. मे २०१९ मध्ये या इंजेक्शनला अमेरिकेने मंजुरी दिली. तेव्हापासून हे सर्वात महाग औषध ठरले. त्याची निर्मिती करणाऱ्या नोव्हार्टिस कंपनीचेे सीईओ वास नरसिंहन म्हणाले, हे सर्वात महाग औषध नाही, व्हॅल्यू फॉर मनी आहे. या आजाराने ग्रस्त मुलांना आधी स्पिनराजा इंजेक्शन दिले जायचे. त्याच्या पहिल्या डोसची किंमत ५.६३ कोटी रुपये आहे. यानंतर आयुष्यभर दरवर्षी चार डोस घ्यावे लागतात. त्याची किंमत २.६३ कोटी रुपये आहे. तथापि, झोलजेन्समा इंजेक्शनचा एकाच डोस पुरेसा आहे. विविध देशांच्या करांमुळे औषधाची किंमत आणखी वाढते.

या इंजेक्शनमध्ये असे काय आहे की त्याची किंमत १६ कोटी रुपये आहे?
कंपन्या औषध तयार करण्यासाठी झालेले संशोधन व बौद्धिक मालमत्तेचा खर्च ग्राहकांकडून वसूल करतात. १० हजार मुलांमधून एकालाच एसएमए हा आजार हाेतो. म्हणजे ७०० कोटी लाेकसंख्येत फक्त ७ लाख रुग्णच संभवतात. यामुळे झोलजेन्समा औषध अति महाग आहे. ते तयार करणारी कंपनी नोव्हार्टिसने ६५.२५ हजार कोटींना विकत घेतली आहे. यामुळे प्रत्येक डोसमागे त्याचीही भर पडली आहे.Post a Comment

 
Top