0

 

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली असून गेल्या २४ तासांत नवीन १३,१९३ रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, शुक्रवारपर्यंत देशात १,०९,६३,३९४ लोकांना संसर्ग झाला. तर, १,०६,६७,७४१ रुग्ण पूर्ण बरे झाले. महाराष्ट्रात शुक्रवारी ६,११२ रुग्ण आढळले असून ४ डिसेंबरनंतर तेथे प्रथमच रुग्णसंख्या ६ हजारांच्या वर गेली आहे. १० दिवसांत रुग्णांची संख्या दुपटीवर गेल्याने चिंता व्यक्त होत आहे. ९ फेब्रुवारी रोजी राज्यात २,५१५ रुग्ण आढळले होते.

दरम्यान, बृहन्मुंबई महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली असून होम क्वाॅरंटाइन, विवाह तसेच सार्वजनिक समारंभांसाठी जाहीर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्या २०,८१,००० हून अधिक ,तर सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ४०,८५८ वर झाली आहे. केरळमध्येही गेल्या २४ तासांत ४,५८४ नवे रुग्ण आढळले. गेल्या दहा दिवसांत तेथे ५ हजारांच्या जवळपास रुग्ण आढळले आहेत.

पश्चिम विदर्भ : दिवसभरात १३४९ नवे रुग्ण, ७ मृत्यू
अकोला | पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवारी १३४९ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अकाेला, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी दाेन जणांचा तर अमरावती जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. शुक्रवारी एका दिवसात अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक ५९८ नवे रुग्ण आढळले, तर बुलडाणा २७१, अकोला २५६, यवतमाळ १२६ आणि वाशीम जिल्ह्यात ९८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ८० हजार ३२४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, तर ७२ हजार १११ बाधितांनी कोरोनावर मात केली.

अमरावती, यवतमाळमधील संसर्गात कोरोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन नाही
मुंबई | अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधताना या भागातील विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये बदल झालेला आहे का, यासंदर्भातही पाहणी करण्यात येत आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. आतापर्यंत अमरावती, यवतमाळ, सातारा भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले आहेत.

मराठवाडा : आठ जिल्ह्यांत आढळले ३८६ रुग्ण, १८७ बरे होऊन परतले
औरंगाबाद | मराठवाड्यात शुक्रवारी आठ जिल्ह्यांत ३८६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. ८ रुग्णांचा मृत्यू झाला. १८७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सध्या २२४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १५८ रुग्ण सापडले. येथेच सर्वाधिक ४ जणांचा मृत्यू झाला. जालना, परभणी, नांदेड व बीड येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. इतर जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी : जालना : ६१, परभणी : १३, हिंगोली :१६, नांदेड : ४५, लातूर : ४८, उस्मानाबाद :१५, बीड : ३०.

देशात एक कोटीहून अधिक लोकांचे लसीकरण, जगातील दुसरा देश
नवी दिल्ली | लसीकरणाच्या टप्प्यांत आतापर्यंत भारतात ३४ दिवसांत १ कोटीहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. सर्वात वेगाने लसीकरण करणारा भारत जगातील दुसरा देश ठरला आहे. भारतात उत्तर प्रदेशने लसीकरणात आघाडी घेत १० लाखांहून अधिक डोस दिले आहेत. लोकसंख्येचा विचार करता तेलंगणाने सर्वाधिक म्हणजे १२ टक्के लोकांना कोरोना लसीचे डोस आतापर्यंत दिले आहेत.


Post a Comment

 
Top