0

 

सद्य:स्थितीत हवामानामध्ये होणारे विचित्र बदल, अवेळी आणि जास्त झालेला तसेच जास्त कालावधीसाठी झालेला पाऊस, उशिरा आलेली थंडी अशा अनेक कारणांमुळे आंबा हंगामावर विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे आंब्याला मोहोराऐवजी पालवी आल्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया उशिरा सुरू झाली. आंबा हंगाम जवळपास एक महिना उशिरा सुरू होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. मार्चमध्ये आंब्याची आवक अतिशय अल्प राहील, असा अंदाज आहे. एकंदरीतच आंबा उपलब्धतेचा कालावधी यंदा कमी असणार आहे.

अशा प्रतिकूल पार्श्वभूमीवरही राज्याच्या पणन मंडळाकडून आंब्याच्या निर्यातवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती मंडळाचे व्यवस्थापक (निर्यात) सतीश वराडे यांनी येथे दिली. ‘विकसित देशांना आंबा निर्यातीकरिता क्रमप्राप्त असलेली मँगोनेट नोंदणी कृषी विभागामार्फत करण्यात येते. या नोंदणीसाठी कृषी विभाग व पणन विभाग यांचे संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, शेतीशाळा अशा उपक्रमातून शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. ताज्या आकडेवारीनुसार यंदा साडेबारा हजार आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मँगोनेट अंतर्गत नोंदणी झालेली आहे. यामध्ये हापूस आंब्याचे नोंदणी झालेले शेतकरी सुमारे नऊ हजार असून अजूनही शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे, असे वराडे यांनी सांगितले.

हापूस आंब्याला भौगोलिक संकेतांक नोंदणी (जीआय) प्राप्त झाली असून कोकणातील आंबा ‘हापूस’ या नावाने विक्री करता यावा व इतर भागातील उत्पादित आंब्याची भेसळ होऊ नये यासाठी भौगोलिक संकेतांक नोंदणीसाठी आंबा उत्पादक, विक्रेते, निर्यातदार व खरेदीदार यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने कृषी पणन मंडळामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. हापूस आंब्याला एक जानेवारी २०२० रोजी भौगोलिक संकेतांक प्राप्त झाला असून ३६८ आंबा उत्पादक नोंदणी झाली आहेत. आंबा विक्रेते, खरेदीदार, व्यापारी, निर्यातदार अशा एकूण ६९ घटकांची नोंदणी झालेली आहे. जास्तीत जास्त उत्पादकांनी भौगोलिक संकेतांक नोंदणी करून घ्यावी, यासाठी नोंदणी करणाऱ्या संस्थांबरोबर पणन मंडळ प्रयत्नशील आहे, असेही वराडे म्हणाले.

कृषी पणन मंडळाची आंबा हंगाम पूर्वतयारी

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने निर्यातवृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राची उभारणी

आंतरराष्ट्रीय पातळीवर आवश्यक निकषांची पूर्तता करून व्हेपर हीट ट्रीटमेंट सुविधा, विकिरण सुविधा तसेच भाजीपाला प्रक्रिया केंद्र या तीनही अद्ययावत सुविधांची उभारणी वाशी नवी मुंबई येथे पणन मंडळाच्या भाजीपाला प्रक्रिया केंद्र, वाशी येथून आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करून युरोपियन देशांना निर्यात

अमेरिका व ऑस्ट्रेलियाकरिता आवश्यक असलेली तीन मिनिटांची ५० ते २०० पी.पी.एम. सोडियम हायपोक्लोराइडची ५२ डिग्री से.ची प्रक्रियेकरिता सुविधा तयार

दक्षिण कोरिया, जपान, न्यूझीलंड, अर्जेंटिना, मलेशिया येथे निर्यातीचे प्रयत्न

निर्यात प्रक्रियेदरम्यान प्रत्येक फळाचे काटेकोर परीक्षण करताना.

खरेदीदार -विक्रेता संमेलन

कृषी पणन मंडळाने आंबा हंगाम २०२१ चे नियोजन सुरू केले आहे. मंडळामार्फत आंबा विक्रीकरिता महोत्सव व निर्यातीबाबत कार्यशाळा, आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातदार व्हावे यासाठी निर्यात प्रशिक्षण कार्यक्रम व अपेडाच्या सहकार्यातून आंब्यासाठी खरेदीदार विक्रेता संमेलनाचे नियोजन करण्यात येत आहे. पणन मंडळाची अद्ययावत निर्यात सुविधा केंद्रे, बागायतदारांची मँगोनेटमध्ये नोंदणी, निर्यातवृद्धीकरिता योजना, देशांतर्गत विक्री व्यवस्थेच्या नियोजनांमुळे यंदा आंबा उत्पादनावर परिणाम झाला असला तरी उत्पादकांना चांगला दर प्राप्त होऊन ग्राहकांना उत्तम प्रतीचा आंबा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले. - सुनील पवार, संचालक, कृषी पणन मंडळ

Post a Comment

 
Top