0

प्रशासकीय समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष

बहुप्रतीक्षित इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी अद्याप केंद्र शासनाने स्पर्धेच्या आयोजनासाठी परवानगी दिलेली नाही. त्याव्यतिरिक्त स्पर्धेशी निगडित अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याने रविवारी होणाऱ्या ‘आयपीएल’च्या प्रशासकीय समितीच्या बैठकीकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

‘आयपीएल’चे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गेल्या आठवडय़ात स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे ‘आयपीएल’ खेळवण्यात येणार आहे. प्रशासकीय समितीच्या बैठकीत प्रमाणित कार्यपद्धती, स्पर्धेचे वेळापत्रक, विदेशी खेळाडूंची उपलब्धता, चिनी प्रायोजकांविरुद्धची भूमिका यांसारख्या मुद्दय़ांवर चर्चा केली जाणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, खजिनदार अरुण धुमाळ, हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंग अमिन यांच्या उपस्थितीत टेलिकॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेण्यात येणार आहे.

Post a Comment

 
Top