0

अतिसंक्रमित भागात महिनाभर टाळेबंदी

महापालिका क्षेत्रातील करोना अतिसंक्रमित परिसरातील टाळेबंदीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने शुक्रवारी घेतला आहे. शहरातील अतिसंक्रमित परिसरांमध्ये नव्या १२ परिसरांचा समावेश करण्यात आला असून यामुळे या परिसराच्या संख्येत वाढ झाली असली तरी पुनर्चनेत मात्र सर्वच परिसराचे क्षेत्रफळ कमी करण्यात आले आहे.

त्यामुळे या यादीतून वगळण्यात आलेल्या परिसरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांची टाळेबंदीतून सुटका झाली आहेराज्य शासनाने मॉल, व्यापारी संकुले सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी ठाणे महापालिकेने मात्र हे बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये १९ जुलैपासून केवळ अतिसंक्रमित परिसरात टाळेबंदी लागू आहे. शहरातील एकूण २७ अतिसंक्रमित परिसरात ही टाळेबंदी लागू आहे. या टाळेबंदीची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. ही मुदत संपण्याच्या दिवशी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नवा आदेश काढला असून त्यात या परिसरातील टाळेबंदीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात रुग्ण संख्येत घट होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गेल्या काही दिवसातील रुग्ण संख्येचा आढावा घेऊन अतिसंक्रमित परिसराची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेतले होते. रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे अतिसंक्रमित परिसर

कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, महापालिकेने टाळेबंदीची मुदत वाढविण्यासंबंधी काढलेल्या आदेशामध्ये शहरातील ३९ अतिसंक्रमित परिसराची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे या परिसराची संख्या २७ वरून ३९ वर पोहचल्याचे चित्र आहे. ज्या भागात रुग्ण आढळून येत आहेत, तेवढाच परिसर किंवा इमारतीचा परिसर नव्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे ही संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. परंतु क्षेत्रफळ कमी केल्याने अनेक परिसर या यादीतून वगळण्यात आले आहेत, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. नवी मुंबईतही टाळेबंदीला आणखी महिनाभर मुदतवाढ देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातही टाळेबंदीला मुदतवाढ

ठाणे जिल्ह्य़ातील अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड यासह भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील अतिसंक्रमित परिसरातील टाळेबंदीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर राज्य शासनाने २९ जुलै रोजी काढलेल्या अध्यादेशामध्ये जी शिथिलता दिली आहे, ती सर्व शिथिलता अतिसंक्रमित क्षेत्र नसलेल्या भागात लागू राहील, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

 


Post a Comment

 
Top