0

योगायोग आपल्याला फार जवळचे वाटतात. त्यांचे अनुभव अनेकदा चकवणारे असले तरी ते हवेसे वाटतात. ‘दिल बेचारा’ हा चित्रपट मात्र याला अपवाद ठरला आहे. एक विचित्र योगायोग या चित्रपटात आहे, पडद्यावर जे घडतं आहे- दिसतं आहे त्याउलट वास्तवात आपण काही तरी अनुभवलं आहे ही भावना हा चित्रपट पाहताना मनात घट्ट धरून असते. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा हा अखेरचा चित्रपट. त्याच्या जाण्याची जणू आधीच कोणाला चाहूल लागावी आणि त्या भरात लिहिलेली त्याच्यावरची शोकांतिका आपल्यासमोर सादर व्हावी इतका विचित्र योगायोगाचा अनुभव हा चित्रपट देतो.

मुकेश छाब्रा दिग्दर्शित ‘दिल बेचारा’ हा चित्रपट ‘डिस्ने-हॉटस्टार’वर प्रदर्शित झाला आहे. मुकेश यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. पहिलेपणाची छाप या चित्रपटाच्या तंत्रावर नाही, पण कथेच्या मांडणीत फार जाणवते. मुळात हा चित्रपट सुशांतच्या निधनानंतर दीड महिन्याने प्रदर्शित झाला आहे. त्याचं जाणं हा देशभरातील त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता, आजही आहे. या धक्क्यातून लोक अजूनही बाहेर पडलेले नाहीत. आणि त्याच्या जाण्यानंतर आजतागायत जे वादांचं मोहोळ दिवसागणिक इंडस्ट्रीत वाढतंय, त्याने सुशांत अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे, त्याहीपेक्षा त्याच्या अचानक आणि अनाकलनीय जाण्याचा सल या वादांनंतर अधिकच टोचतो आहे. या पार्श्वभूमीवरसुशांतचा तोच हसतमुख, प्रेमळ चेहरा पाहिल्यानंतर कथा मागे पडते आणि पडद्यावर दिसणारा सुशांत आपण अधिक अनुभवत राहतो. ‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ या जॉन ग्रीन यांच्या कादंबरीवर आधारित ‘दिल बेचारा’ या चित्रपटात किझी बासू (संजना संघी) आणि इमॅन्युअल राजकु मार ज्युनिअर (सुशांत सिंह राजपूत) यांची प्रेमकथा पाहायला मिळते. दोघेही कर्करोगाने ग्रस्त आहेत. किझीला घशाचा कर्करोग आहे आणि सतत ऑक्सिजनचा सिलेंडर पाठीवर घेऊन तिच्या आयुष्यातील कित्येक वर्षांची पानं कं टाळलेपणाने पुढे सरकताहेत. तर इमॅन्युअल ऊर्फ मॅनीला हाडाचा कर्करोग आहे. या कर्करोगात त्याने एक पाय गमावला आहे. एकीकडे सतत आईवडिलांच्या प्रेमाच्या सावलीत असलेली किझी आणि दुसरीकडे आईवडिलांपासून दूर आजीबरोबर राहणारा मॅनी या दोघांचेही स्वभाव परस्परविरोधी आहेत. पण प्रेमाला अशा चौकटी नसतात. उत्साहाच्या धबधब्यासारखा मॅनी आणि शांत-सहज, गोड स्वभावाची किझी.. दोघांनाही माहिती आहे त्यांच्या आयुष्याचा पट फार मोठा नाही. आणि तरीही या पटात प्रेमाचे रंग भरण्याची तयारीही ते करतात. त्यांची प्रेमकथा पुढे जाण्यासाठी आणखी एक उद्देश या दोघांकडे आहे तो म्हणजे किझीचा आवडता संगीतकार अभिमन्यू वर्माचा शोध आणि त्याच्या अर्धवट राहिलेल्या गाण्यामागचे कारण शोधणं.. या शोधाच्या प्रवासातच त्यांची प्रेमकथा अधिक घट्ट होत जाते. एक होता राजा आणि एक होती राणी यांची ही गोष्ट सुखांत नाहीच.. आणि एका अर्थी आहे.

Post a Comment

 
Top