
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय बुधवारी आरोग्य विभागाने जारी केला आहे. अधिग्रहित केलेल्या रुग्णवाहिका जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येतील.
कोरोनाकाळात खासगी रुग्णवाहिकांसाठी रुग्णांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन खासगी रुग्णवाहिका आणि वाहने अधिग्रहित करताना त्यांचा दर निश्चित करून ते उपलब्ध करून देण्यात येईल. अधिग्रहित केलेल्या रुग्णवाहिका आणि वाहने २४ तास उपलब्ध राहतील. रुग्णवाहिका अधिग्रहित करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त राबवतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या रुग्णवाहिका वाहनचालकासह, इंधनाच्या खर्चासह भाडेतत्त्वावर घेता येतील अथवा जेथे वाहनचालक उपलब्ध नसेल तेथे रुग्णवाहिका मासिक भाडेतत्त्वावर ताब्यात घेण्यात येतील. त्यांना स्थानिक परिवहन मंडळ, राज्य परिवहन, चालक पुरवठा कंपन्या, स्थानिक प्रशासनाकडील वाहनचालकांच्या सेवा अधिग्रहित करून चालक उपलब्ध केले जातील.
अधिग्रहित रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध
रुग्णवाहिकेत स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा, टोल फ्री १०८ रुग्णवाहिकेचे ॲपही त्यात असेल. रुग्णवाहिकेसाठी रुग्णांना १०८ क्रमांक किंवा स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल.
Post a Comment