0

आपल्या देशात सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कारण सरकारी नोकरीत चांगला पगार, भत्ता, नोकरीची सुरक्षा आणि इतर सुविधाही मिळतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी या युवकांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील मार्गावर चालावे लागते. साधारणत: विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी पदवी पूर्ण होण्याची वाट बघतात. मात्र, काही सरकारी परीक्षा इयत्ता बारावीनंतरदेखील देता येतात हे तुम्हाला माहिती आहे का? बारावीनंतर या परीक्षा देऊन तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकता. बहुतांश नोकऱ्यांसाठी पदवीधर असणे ही किमान पात्रता असते हे योग्य आहे. मात्र इतर परीक्षांसाठी पात्रतेचे निकष काहीसे वेगळे असतात. या परीक्षांच्या माध्यमातून तुम्ही सरकारी नोकरीची इच्छा पूर्ण करू शकता. जाणून घेऊयात अशा काही प्रमुख परीक्षांबाबत-

भारतीय लष्करासाठीच्या परीक्षा

बारावी पास झालेले विद्यार्थी भारतीय सैन्यात दोन प्रकारे प्रवेश मिळवू शकतात. या दोन्ही परीक्षा सैन्याच्या पर्मनंट कमिशनकडून घेतल्या जातात. यात पहिली परीक्षा एनडीए, तर टेक्निकल एंट्री स्कीम (टीईएस) ही दुसरी परीक्षा आहे. याशिवाय १२ वीचे विद्यार्थी बीटेक एंट्रीच्या माध्यमातून नौदलात दाखल होऊ शकतात.

एनडीए व एनए परीक्षा : नॅशनल डिफेन्स अकॅडमी व नेव्हल अकॅडमी परीक्षा यूपीएससीद्वारे वर्षातून दोनदा आयोजित केली जाते. या माध्यमातून सैन्य, नौदल, हवाईदलात दाखल होता येते. भौतिकशास्त्र आणि गणितात बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय १६.५ ते १९.५ दरम्यान असायला हवे. निवड झाल्यानंतर उमेदवारांना चार वर्षे प्रशिक्षण दिले जाते.

टीईएस : टेक्निकल एंट्री स्कीमसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थी सायन्स स्ट्रीम म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणितामध्ये किमान ७० टक्क्यांसह उत्तीर्ण होणे गरजेचे आहेत. यात थेट एसएसबीद्वारे प्रवेश दिला जातो. अर्जदाराचे वय १६.५ ते १९.५ दरम्यान असणे गरजेचे आहे. यासाठी निवड झालेेल्या उमेदवारांना पाच वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते.

१०+२ नेव्ही बीटेक एंट्री : नौदलात दाखल होण्यासाठी असलेली ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांमध्ये किमान ७० टक्के, तर बारावीला इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. जेईई मेनच्या रँकच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते. यामुळे जेईई मुख्य परीक्षेसाठी पात्र असणेही आ‌वश्यक आहे. अर्जदाराचे वय १६.५ ते १९.५ वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते.


स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा

एसएससी परीक्षा देशातील काही महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक आहे. बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांसाठी एसएससी सीएचएसएल (कम्बाइंड हायर सेकंडरी लेव्हल) ही परीक्षा आहे. या श्रेणीतील काही परीक्षा पुढीलप्रमाणे-

{पीए (पोस्टल असिस्टंट) : ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल असिस्टंट म्हणून नियुक्त केले जाते. {डीईओ (डेटा एंट्री ऑपरेटर) : बारावी उत्तीर्ण असणे ही पात्रता आहे. मात्र ऑफिस ऑफ कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियामध्ये डीईओ पदासाठी विज्ञान व गणितात बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

{एलडीसी (लोअर डिव्हिजन क्लार्क) : ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आणखी परीक्षा देऊन पदोन्नती मिळू शकते.

एसएससीच्या इतर परीक्षा : सीएचएसएल शिवाय एसएससीकडून आणखी पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात.

{स्टेनोग्राफर : एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डीसाठी ही परीक्षा घेतली जाते. यासाठी बारावी उत्तीर्ण असण्यासह स्टेनोग्राफीची माहिती असणे गरजेचे आहे. ग्रेड सीसाठी १८ ते ३० वर्षे व ग्रेड डीसाठी १८ ते २७ वर्षांचे उमेदवार अर्ज करू शकतात. कॉम्प्युटर आधारित परीक्षेनंतर स्किल टेस्टही घेतली जाते. स्टेनोग्राफी टेस्ट हिंदी व इंग्रजी दोन्ही भाषेत घेतली जाते.

{जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल : ही परीक्षा एसएससीद्वारे बीएसएफशिवाय सीआयएसएफ, आयटीबीपी, सीआरपीएफ, रायफलमॅनमध्ये कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी घेतली जाते. बारावीनंतर देता येते.


भारतीय रेल्वेतील नोकरीसाठी परीक्षा
सरकारी नोकरीसाठी भारतीय रेल्वे हे आ‌वडत्या क्षेत्रांपैकी एक मानले जाते. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रांमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. विशेषत: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे भरती मंडळाकडून विविध विभागनिहाय या परीक्षांचे आयोजन केले जाते. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयआरबीकडून विविध पदांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा जाणून घेऊयात.

  • रेल्वे क्लार्क आणि कॉन्स्टेबल्स
  • ग्रुप डी स्टाफ
  • असिस्टंट लोको पायलट
  • लोअर डिव्हिजन क्लार्क आणि मल्टी टास्किंग स्टाफ
  • रेल्वे इन्फर्मेशन डिपार्टमेंट
  • रेल्वे ड्रायव्हर

Post a Comment

 
Top