0

सोमवारी (दि. 11) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी भेट दिली असून, ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. 
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कराड - तासगाव रस्त्यालगत कराड तालुक्यातील शेणोली (शेरे स्टेशन) येथे के. डी. मदने यांच्या बंगल्यात वरील मजल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. सोमवारी महाराष्ट्र बँकेच्या शेणोली शाखेचे कामकाज नियमित सुरू होते. त्यामुळे दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बँकेतील कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त असताना व उपस्थित पाच ते सहा ग्राहकांना सेवा देत असताना अचानक दोन चार चाकी वाहनांमधून आलेल्या चौघांनी हातात पिस्तुल घेऊन बँकेत प्रवेश केला. पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडेखोरांनी बँकेतील कर्मचारी व ग्राहकांना भीती दाखविण्यासाठी भिंतीवर गोळीबार केला. यावेळी बँकेत सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकाची नियुक्‍तीच करण्यात आली नसल्याने दरोडेखोरांना कोणाचाच प्रतिकार झाला नाही. बँकेत प्रवेश केल्यानंतर दरोडेखोरांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर समजून बँकेच्या अंतर्गत कामकाजाची वायर तोडली. त्यामुळे बँकेतील संगणकासह इतर यंत्रणा बंद पडली. मात्र, सीसीटीव्ही यंत्रणा सुरु राहिल्याने दरोडेखोरांचा बँकेतील वावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. 
दरोडेखोरांनी बँकेच्या अधिकार्‍यांसह कर्मचारी व ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवत बँकेतील सेफ रूममध्ये कोंडून घातले. तसेच बाहेर आल्यास गोळी घालण्याची धमकी दिली. त्यानंतर दरोडेखोरांनी कॅश काउंटर व स्ट्राँग रूममधील सुमारे 22 लाख रुपयांची रोख रक्कम व दहा तोळे सोन्याचे दागिने पोत्यामध्ये भरण्यास सुरवात केली. रक्कम व सोन्याचे दागिने पोत्यात भरुन झाल्यानंतर दरोडेखोरांनी बँकेतून बाहेर पडताना बँकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांजवळील मोबाईल फोन घेऊन तेथून पोबारा केला. केवळ 15 मिनिटांत बँकेवर दरोडा टाकून दरोडेखोर पसार झाल्याने त्यांनी ते काम अतिशय नियोजनबध्द केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. 
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. दरोडेखोरांनी बँके कर्मचारी व ग्राहकांना भीती दाखविण्यासाठी भिंतीवर केलेल्या गोळीबारातील एक पुंगळी पोलिसांना बँकेत सापडली आहे. तसेच दरोडेखोरांनी कर्मचार्‍यांचे नेलेले मोबाईल सुरुच राहिल्याने  सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांचे लोकेशन कुंडल (जि. सांगली) येथे दाखविले. त्यामुळे पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी सातारासह सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे. 

Post a comment

 
Top