0
श्रीरामपूर :

काँग्रेसशी युती न झाल्यास  राज्यात लोकसभेच्या सर्व 48 जागा स्वबळावर लढविणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.  श्रीरामपूर येथे गुरुवारी (दि.31) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा आराखडा काँग्रेसने आम्हाला द्यावा, अशी मागणी आम्ही केलेली आहे. परंतु, काँग्रेसने याबाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे सध्या आम्ही प्रतीक्षेच्या भूमिकेत आहोत.

काँग्रेसकडे आम्ही 12 जागा मागितलेल्या आहेत. परंतु , त्या कुठल्या हव्यात, याचा निर्णयही आम्ही काँग्रेसवर सोपविलेला आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये वंचितांना संधी देण्यात येणार आहे. यात कोणत्याही जाती धर्माचा विचार करण्यात येणार नाही. काँग्रेसची आणि आमची युती झाली तरीही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार नाही. काँग्रेसने राष्ट्रवादीचा प्रचार करावा. राष्ट्रवादी हा पक्ष संभाजी भिडे चालवित असल्याचा घणाघाती आरोपही त्यांना यावेळी केला.

भाजपाचे सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत चालवित आहेत. भाजपला आरक्षण संपवायचे आहे. मनुवादी संविधान आणायचे आहे. त्यामुळे सध्या  दोन समांतर प्रशासन देशात कार्यरत आहेत. एक राष्ट्रपतींच्या माध्यमातून तर दुसरे आरएसएसच्या माध्यमातून मोहन भागवत चालवित आहेत. राम मंदिराबाबत न्यायालयाचा निकाल आल्यानंतर निर्णय घेऊ, अशी भूमिका पंतप्रधानांची आहे. तर दुसरीकडे 21 फेब्रुवारीला राम मंदिराचे बांधकाम सुरू करू, असे भागवत सांगत आहेत. हे समांतर व्यवस्थापन असून, ते असंवैधानिक आहे. सध्या राज्यात जातीवरच्या नेत्यांची संख्या वाढली आहे. अशा नेत्यांना आमच्या पक्षात कोणतेही स्थान नसल्याचे सांगत, नाव न घेता आंबेडकर यांनी ना. रामदास आठवले यांना टोला लगावला.

शिवसेना ही भाजपाची प्रेयसी!

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीबद्दल अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेना ही भाजपाची प्रेयसी आहे. प्रेयसीबरोबर भांडणे होत असतात. परंतु, संबंध तुटत नसतात. त्यामुळे ते स्वतंत्र लढले तर प्रेयसीच्या प्रश्‍नांचे उत्तर देणे प्रियकराला अडचणीचे होईल. त्यामुळे त्यांची युती होईलच. सेना-भाजप युती राहिली तर याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होईल, असा दावाही आंबेडकर यांनी केला.

Post a comment

 
Top