0
विटा  :

खानापुरात मध्यवस्तीतील बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह  5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. याबाबत विटा पोलिसांत अरविंद भास्कर डोंगरे यांनी फिर्याद दिली आहे. मध्यवस्तीत झालेल्या धाडसी चोरीमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खानापूर येथील मध्यवस्तीत अरविंद डोंगरे यांचे गणेश ट्रेडर्स हे खताचे दुकान आहे. या दुकानामागे त्यांचा बंगला आहे. या बंगल्यात ते पत्नी, मुलगा आणि सासू उषा यांच्यासह राहतात. बुधवारी रात्री ते वरच्या खोलीमध्ये झोपले होते. सासू उषा या खालच्या खोलीत झोपल्या होत्या. पहाटे डोंगरे हे बाथरूमकडे निघाले होते. त्यावेळी त्यांना दरवाजा उघडेना. त्यामुळे त्यांनी सासू उषा यांना दूरध्वनी करून दरवाजा उघडण्यास सांगितले. उषा यांनी दरवाजा उघडल्यावर खालच्या खोलीत बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. समोर असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. बेडरूमच्या खिडकीचे गज कापल्याचे दिसले. चोरट्यांनी या खिडकीतून घरात प्रवेश करून तिजोरीतील 60 हजार रुपयांचे सोन्याचे 3 तोळ्यांचे गंठण, 20 हजारांची 1 तोळ्याची वज्रटिका, 40 हजारांची 2 तोळ्यांची चेन, अडीच तोळ्याच्या 44 हजाराच्या अंगठ्या, 80 हजाराच्या सोन्याच्या 4 तोळ्याच्या रिंगा, दीड तोळ्याचे 24 हजाराचे सोन्याचे ब्रासलेट,28 हजाराचा दीड तोळ्याचा लक्ष्मीहार, 8 हजाराची कर्णफुले, 16 हजाराचे सोन्याचे शिक्के , 6 हजाराची सोन्याची नथ, 80 हजार रुपयांची रोख रक्कम, 20 हजाराचा चांदीचा तांब्या,13 हजाराचे चांदीचे ताट,30 हजाराची चांदीची नाणी, 7 हजाराचे चांदीचे पेले, 25 हजाराची चांदीची भांडी असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे डोंगरे यांच्या लक्षात आले.

डोंगरे यांनी चोरीबाबत तात्काळ विटा पोलिसांना कळविले. उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर, निरीक्षक रविंद्र पिसाळ, उपनिरीक्षक नानासाहेब सावंत यांनी घटनास्थळी घेतली.  सांगलीहून श्‍वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्‍नानाने डोंगरे यांच्या घराशेजारी 100 मीटर पूर्वेपर्यंत चोरट्यांचा माग दाखविला. त्यामुळे चोरटे हे भिवघाट भागात गेले असावेत, असे पोलिसांनी सांगितले.

Post a comment

 
Top