0
कोल्हापूर :

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला अर्थसंकल्पात 2019-20 या वर्षांसाठी दहा हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासह हातकणंगले-इचलकरंजी या नव्या मार्गासाठीही दहा हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गाविषयी आशा पल्लवीत झाल्या आहेत.
कोल्हापूर कोकणला जोडावे, ही गेल्या 40 वर्षांपासूनची मागणी होती. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 26 फेब्रुवारी 2016 ला कोल्हापूर-वैभववाडी या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली.


रेल्वे आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्‍त भागीदारीतून कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग साकारला जाणार आहे. रेल्वेच्या वतीने या मार्गासाठी 1 हजार 374 कोटी रुपये आपला हिस्सा म्हणून मंजूर केले. राज्य शासनाने महाराष्ट्र लोहमार्ग विकास कंपनी स्थापन करून त्याद्वारे या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, 2017 पासून स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बंद करण्यात आला. यावेळी प्रथमच सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वेचा समावेश करण्यात आला.
2017 मध्ये रेल्वेने जाहीर केलेल्या ‘पिंकबुक’मध्ये कोल्हापूर-वैभववाडी या मार्गासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यानंतर मात्र या मार्गाला अपेक्षित गती मिळाली नाही.

आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात कोल्हापूर-वैभववाडी या मार्गासाठी यावर्षी टोकन म्हणून दहा हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हातकणंगले-इचलकरंजी या आठ किलोमीटरच्या मार्गासाठी रेल्वेने 160 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या मार्गावर गेल्यावर्षी कोणताही खर्च झाला नाही. यामुळे 2019-20 या वर्षासाठी या मार्गाकरिताही दहा हजार रुपयांची टोकन म्हणून तरतूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर-वैभववाडी हा 107 किलोमीटरचा मार्ग म्हणजे निसर्गाच्या कुशीतून जाणारा विकासाचा मार्ग ठरणार आहे. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, पर्यटन आदींना चालना देणारा हा मार्ग देशाची पूर्व आणि पश्‍चिम किनारपट्टी जोडणारा सर्वात महत्त्वाचा मार्गही ठरणार आहे. यामुळे या मार्गाची उभारणी ही काळाची गरज आहे. हा मार्ग मंजूर झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गती दिसत नसल्याने या मार्गाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी तरतूद केली आहे. यामुळे भविष्यात या मार्गाच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर-मिरज मार्गावर क्रॉसिंग क्रमांक 20 येथे उड्डाण पूल मंजूर करण्यात आला आहे.

कराड-चिपळूण मार्गालाही गती
कराड-चिपळूण मार्गाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या मार्गाच्या कामासाठी कंपनीही निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, त्याचे काम सुरू झाले नाही. यामुळे हे कामही रेंगाळणार का, असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, या मार्गासाठीही दहा हजार रुपयांची या वर्षासाठी टोकन तरतूद करण्यात आली आहे. यासह फलटण-पंढरपूर या 105 कि.मी.च्या मार्गासाठीही तरतूद करण्यात आली आहे.

सोलापूर-उस्मानाबाद या तुळजापूरमार्गे जाणार्‍या 84.44 कि.मी.च्या नव्या मार्गाची घोषणा करण्यात आली. त्यासाठी 904 कोटींची तरतूद करण्यात आली.

Post a comment

 
Top