0
सातारा-लिंब : 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजसमोर कारने दुचाकीला ठोकर दिल्यानंतर कार व दुचाकी कॉलेजमधील दोन विद्यार्थिनींच्या अंगावर जावून भीषण अपघात झाला. यामध्ये विद्यार्थिनीसह एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  सतीश किसन यादव (वय 45 रा. लाडेगाव, ता. खटाव), उत्तम महादेव लवळे (वय 56, रा. संभाजीनगर सातारा) अशी दुचाकीवरील जखमींची नावे आहेत. सायली संजय इथापे (वय 19, रा. चिंधवली) व प्राजक्ता जगताप (वय 19, रा. शेंदूरजणे, ता. वाई) अशी जखमी विद्यार्थिनींची नावे आहेत. यातील सतीश व सायली हे दोघे गंभीर जखमी झालेले आहेत.


याबाबत घटनास्थळावरून व सिव्हील रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी, साताराकडून वाईकडे स्विफ्ट कार (क्र. एमएच 11 सीएल 3432) ही निघाली होती. कार  शुक्रवारी दुपारी 4 वाजता महामार्गावरील गौरीशंकर कॉलेजसमोर आल्यानंतर कारने पाठीमागून दुचाकीला धडक दिली. या दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याने दुचाकीवरील दोघेही हवेत उडाले. त्यातील एकजण दुचाकीमध्ये अडकला व दुसरा कारच्या बॉनेटवर आपटला.

या अपघातामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटले. अपघातग्रस्त कार व दुचाकी तशीच पुढे रेटत गेली. यावेळी कॉलेज सुटल्याने दोन्ही विद्यार्थिनी एसटीची वाट पाहत उभ्या राहिल्या होत्या. अपघातग्रस्त दोन्ही वाहने त्या युवतींच्या अंगावर गेली. या सर्व घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. कारची एवढ्या जोरात धडक बसली होती की, दुचाकीस्वार व विद्यर्थिनी सुमारे पाच ते सात फुट फरफटत गेले. दुचाकीवरील दोघे व विद्यार्थिनी जखमी झाल्याने परिसरातील इतर नागरिक, विद्यार्थी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात कार, दुचाकीचा चक्‍काचूर झाला होता. परिसरात रुग्णवाहिका असल्याने तत्काळ जखमींना त्यातून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती तालुका पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. कॉलेजच्या प्रशासनानेही तत्काळ सिव्हीलमध्ये जावून विद्यार्थिनींच्या उपचाराची माहिती कुटुंबियांना कळवली.  दरम्यान, अपघातामध्ये दोघांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Post a comment

 
Top