0
औंध :

बैलगाडी शर्यतीवरील बंदी व सततचा दुष्काळ यामुळे देशी जनावरांमधील रुबाबदार म्हणून ओळखली जाणारी खिलार जात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, जनावरांच्या यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या औंध यात्रेतही कमी प्रमाणात खिलार जातीची जनावरे आल्याने येत्या काही वर्षांत ग्रामीण भागात सर्जा राजाची हाळी घुमणार का? हाच खरा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


मागील काही वर्षांमध्ये बैलगाडी शर्यतीमुळे बैलांचे अतिशय चांगल्या पद्धतीने पालन-पोषण होत होते. शर्यतीच्या बैलांची विशेष काळजी घेतली जात  होती व शर्यतीच्या प्रेरणेतूनच अनेक वर्षे बैलांच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल ग्रामीण अर्थव्यवस्थेत पहावयास मिळत होती. काही नियम, अटी ठेवून व बैलांवर अत्याचार होणार नाही, असे नियम करून होणारी बैलगाडी शर्यत ही चांगली का वाईट याहीपेक्षा या शर्यतीच्या प्रेरणेतून लाखो गाय-बैल शेतकरी स्वखर्चाने सांभाळतात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. राज्य सरकारने बैलगाडी शर्यती सुरू करण्यासाठी कायदा केला असला तरी या कायद्यास न्यायालयात आव्हान दिल्याने कायद्याची अद्याप अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. सध्या राज्याचा बैलगाडी शर्यतीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

राज्यात शर्यतबंदीचा फटका खिलारच्या संगोपनास बसल्याने या जनावरांची संख्या मागील काही वर्षांपासून लक्षणीय कमी झाली आहे. याबाबत खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या औंध  यात्रेमध्ये मागील आठ ते दहा वर्षापूर्वी पंधरा ते वीस हजार जनावरे येत होती. त्यामध्ये खिलार जनावरांची संख्या ही मोठी होती. पण, बैलगाडी शर्यत बंदी, वाढते यांत्रिकीकरण, दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकर्‍यांनी जनावरे मोठ्या प्रमाणात कमी करून टाकली आहेत. त्याचाच फटका यंदाच्या यात्रेतील जनावरांच्या संख्येवर आढळला.

घरात मल्ल व दारात वळू हे बिरुद अभिमानाने ग्रामीण भागात मिरवले जात होते त्याच खिलार बैलांची संख्या दिवसेंदिवस रोडावत असून ही एक धोक्याची घंटा आहे. येत्या काही वर्षांत बळीराजाने उभारलेले जनावरांचे गोठे ओस पडतात की काय ?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीचा तसेच हॉर्वेस्टर, मळणी व अन्य कामासाठी विविध यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने बैलांची तसेच पाळीव जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

बळीराजाला प्रोत्साहन द्यावे...

शासनाने देशी गाई तसेच अन्य जनावरांची संख्या वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जनावरांच्या मोडीत निघू लागलेल्या यात्रांसाठी शेतकर्‍यांना व बाजार समित्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावे तसेच बैल, खिलार जनावरांबरोबर घोडे, शेळ्या, मेंढ्या व अन्य पाळीव प्राण्यांनाही या यात्रांमध्ये आणण्यासाठी परवानगी द्यावी. जनावरांचे भव्य दिव्य प्रदर्शन भरवून बळीराजाला प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरु लागली आहे.

Post a comment

 
Top