0
सातारा :

खासगीकरणामुळे दूध व्यवसायात खासगी संघांनी शिरकाव केल्याने शासनाने तोट्यातील स्वत:चे दूध संघ बंद केले आहेत तर खासगी दूध संघांना मान्यता दिल्याने खासगी संघ वाढले आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर शासकीय दूध कार्यालय सुरू करण्यात आले. परंतु, सद्यस्थितीत या व्यवसायाची झालेली वाताहात आणि शासनाचे कमी झालेले नियंत्रण यामुळे हे कार्यालय नावालाच राहिले आहे. संघ बंद पडल्याने दूधाचे संकलन कमी झाले. त्यामुळे कर्मचार्‍यांची पदे रिक्‍त राहू लागली. याचा परिणाम म्हणून या कार्यालयात मूळ पदावरील एकही कर्मचारी कार्यरत नसल्याचे भकास चित्र पहावयास मिळत आहे.


जागतिकीकरणाचा भारताने स्वीकार केल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात खासगीकरण झाले. याचे चांगले परिणाम पहिल्या 10-15 वर्षात दिसून आले. मात्र, त्यानंतर आता या खासगीकरणाने शासनाच्या सर्वच विभागात शिरकाव केल्याने अनेक संस्था बंद पडू लागल्या आहेत. शेतीसोबत उत्तम जोडधंदा म्हणून दूग्ध व्यवसाय केला जातो. मात्र, खासगीकरणामुळे या धंद्यालाही आता ग्रहण लागले आहे. खर्च जास्त अन् उत्पादन कमी अशी अवस्था आहे. त्यामुळे हा व्यवसाय तोट्यात आहे.

सातारा जिल्ह्यात एमआयडीसीमध्ये शासकीय दूध कार्यालय आहे. या ठिकाणी 20 वर्षांपूर्वी सुमारे 1 लाख लिटर दूधाचे रोज संकलन केले जात होते. त्यामुळे त्यावेळी या कार्यालयात रोज राबता होता. टँकरच्या लांबच लांब रांगा लागत होत्या तर मशिनरींचा धडाधड आवाज होता. मात्र, आता हे कार्यालय जणू स्मशान भूमीच झाले की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. हे जिल्ह्याचे कार्यालय आहे. या ठिकाणी एकूण 14 पदे मंजूर आहेत. मात्र, यापैकी लिपिक वगळता अन्य पदे रिक्‍तच आहेत. या ठिकाणी फक्‍त एक कर्मचारी पूर्ण जिल्ह्याचे काम पाहत आहे. संबंधित कर्मचारीही महाबळेश्‍वर येथील दूध संघाचा आहे. मात्र हा संघच आता बंद झाल्याने ते सातार्‍यात काम करतात.  ज्या ठिकाणी 1 लाख लिटर दूधाचे संकलन केले जात होते तो प्लँटच आता बंद पडला आहे. काही दिवसांपूर्वी दूधावर प्रक्रिया करणार्‍या मशिनरीही भंगारात काढण्यात आल्या आहेत. या कार्यालयाखाली दोन अन्य कार्यालये आहेत. ती दूग्ध विकास विभागाची आहेत मात्र, तेथेही अशीच परिस्थिती आहे.

या ठिकाणी असणार्‍या क्‍वार्टरही बंद अवस्थेत आहेत तर सुमारे 4 एकरात पसरलेल्या या कार्यालयाच्या आवारात गवत वाढल्याने बकालपणा आला आहे. कार्यालयात जे दोन कर्मचारी असतात त्यांच्यावरच कामाचा लोड आहे. जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघाच्या संकलनाची माहिती घेणे, तालुकास्तरावर असणार्‍या अधिकार्‍यांना भेटीसाठी पाठवणे, दूध संघाची तपासणी करणे यासारखी कामे त्यांना करावी लागतात. कर्मचार्‍यांची अशी अवस्था असताना जिल्हा दूग्ध विकास अधिकारी म्हणून प्रकाश आवटे यांची शासनाने नियुक्‍ती केली आहे. परंतु, त्यांनाही इतर पाच जिल्ह्याच्या विविध विभागांचा अतिरिक्‍त कार्यभार असल्याने महिन्यातून दोन किंवा तीनवेळा ते सातार्‍यात हजेरी लावतात. त्यांच्याकडूनही फक्‍त कामाचा आढावा घेण्याबाहेर कोणतेही काम केले जात नाही. 

मनुष्यबळाची कमतरता असल्याने हा विभाग आता मरणासन्‍न अवस्थेत पोहोचला आहे. याचाच फायदा खासगी दूध संघवाले उचलत आहे. त्यांच्याकडूनच शेतकर्‍यांची पिळवणूक होत असून मनमानी कारभाराला उत आला आहे. मुळात शासनालाच या विभागाला पुन्हा गतवैभव प्राप्‍त करून द्यावे, अशी इच्छा नाही. त्यामुळे येथील कर्मचारी आला दिवस ढकलत आहे.

20 हजार लिटर दूध संकलन कधी?

काही दिवसांपूर्वीच शासकीय दूध कार्यालयातील जुनी मशिनरी भंगारात काढण्यात आली. या मशिनरीद्वारे 1 लाख लिटर दूध संकलित करून त्यावर प्रक्रिया होत होती. हा प्लँट बंद पडल्यानंतर दुग्ध विकास मंत्री ना. महादेव जानकर यांनी सातार्‍यात 20 हजार लिटर दूध संकलित केले जाईल असा प्लँट उभारण्याचे संकेत दिले होते. मात्र, हा प्लँट अजून कागदावरच राहिला आहे. निवडणूका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना याचीही शक्यता आता मावळली आहे. जरी भविष्यात या ठिकाणी प्लँट झाला तरी दूध कोठून आणणार? हा प्रश्‍नच आहे. 

Post a comment

 
Top