0
सातारा :

भारतीय जनता पार्टीसोबत सातारा जिल्ह्यात गेली साडेचार वर्षे सोबत राहिलो मात्र, पक्षाला दयाच आली नाही. त्यामुळे बीजेपी सन्मान देणार नसेल  तर रिपाइं त्यांच्यासोबत राहणार नसल्याचा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला.


अशोकराव गायकवाड म्हणाले, महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात दलितांवर जास्त अन्याय, अत्याचार झाले आहेत.अन्याय, अत्याचार कमी करुन सामान्य माणसाला मुक्त श्‍वास घेण्यासाठी दि. 3 मार्च रोजी राजवाडा येथे रिपाइंची जाहीर सभा व महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पक्षाची ताकद दाखवून देण्यात येणार आहे. जे कार्यकर्ते पक्षाचे काम करत नाहीत त्यांना बदलण्यात येणार आहे.

दलितांवर घडलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत, त्याला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. यामधून पिडीतांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

पाटण तालुक्यातील नाभिक समाजातील मुलीचा खून करून तिच्यावर अत्याचार करणार्‍या नराधमांना अजूनही अटक केली नसून त्यांना तात्काळ अटक करावी, कराड येथेही अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे आरोपी मोकाट फिरत असून पोलिसांनी त्यांना अजून अटक केली नाही, असे गायकवाड यांनी सांगितले.

युतीचा धर्म आम्ही पाळला आहे. साडेचार वर्षे आम्ही सोबत राहिलो मात्र, मित्र पक्षाला आमची दया आली नाही. चार वर्षात कमिट्या तयार झाल्या, त्यामध्ये रिपाइंच्या एकाही कार्यकर्त्याला घेण्यात आले नाही.त्यामुळे गेली साडेचार वर्षे आमचे शोषण केले आहे, जर अशा पध्दतीने वागणूक मिळत असेल भविष्यकाळात निर्णय बदलू. भाजपा सन्मान देणार नसेल तर सोबत राहणार नसून साडेचार वर्षाची भरपाई द्यावी, असेही गायकवाड म्हणाले.

मुख्यमंत्री आले त्यावेळीही मित्रपक्षाला बोलावले नाही. गरज नसेल तर जायचे कशाला? अगामी निवडणूकीबाबत काय निर्णय घ्यायचा ते जनताच ठरवणार आहे. आम्ही नेत्याचा आदर करून पक्ष चालवणारे कार्यकर्ते आहोत. आजही आम्ही कार्यकर्त्यांचा सन्मान करतो. कार्यकर्ते गेले तरी नव्याने कार्यकर्ते येत असतात.ज्यांच्या रक्तात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत ते निष्ठेने काम करतात, असेही गायकवाड म्हणाले. यावेळी अप्पा तुपे, वैभव गायकवाड व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a comment

 
Top