0
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्षाच्या कार्यकारिणी समितीची बैठक ही पुढे ढकलली आहे. ही बैठक उद्या (गुरुवार) अहमदाबाद येथे होणार होती. भारतीय वायूसेनेच्या विमानांनी मंगळवारी पीओकेतील बालाकोट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ले केले होते. या हल्ल्यात अनेक दहशतवादी तळ नष्ट झाले तसेच २०० ते ३०० च्या आसपास दहशतवादीही मारले गेले होते. त्यानंतर दोन्ही देशात कमालीचा तणाव निर्माण झाला असून पाकिस्तानी लष्कराच्या विमानांनी बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. भारताने त्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांचे एफ १६ विमान पाडले. त्यामुळे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची नियोजनाप्रमाणे गुरूवारी अहमदाबाद येथे बैठक होणार होती. देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता पक्षाने ही बैठक पुढे ढकलली आहे.

दरम्यान, लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळं हाय अलर्टवर असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. यामुळे अनेक विमाने विमानतळांवर अडकून पडली असल्याची माहिती मिळत आहे. भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता पाकिस्तानच्या विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. जम्मू- काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. यानंतरच विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीनगर विमानतळ तीन तासांसाठी बंद करण्यात आलं आहे.


Post a comment

 
Top