0
उटगी  :

उमदी (ता. जत) येथील बस स्थानक परिसरात विनापरवाना पिस्तुले बाळगल्याबद्दल दोघांना पोलिसांनी अटक केली. राकेश मधुकर कदम (वय 32, रा. नरसिंहगाव, ता. कवठेमहांकाळ) आणि रोहित अंकुश मंडले (वय 20, रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ) अशी त्यांची नावे आहेेत. त्यांच्याजवळची तीन पिस्तुले आणि जिवंत काडतुसे असा दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.


उमदी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी : या दोघांकडे विनापरवाना पिस्तुले असल्याची माहिती  सहाय्यक पोलिस निरीक्षक  भगवान शिंदे यांना मिळाली होती.  त्यांनी सापळा रचून शुक्रवारी सायंकाळी  कारवाई केली. तीन पिस्तुले व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ही पिस्तुले गावठी बनावटीची आहेत. त्यांच्या मुठींच्या  दोन्ही बाजूंना प्लास्टिकची काळ्या रंगाची पट्टी आहे. पिस्तुलावर मेड इन यु. एस. ए. असे  लिहिलेले आहे. स्टेनलेस स्टीलचे कव्हर असलेली तीन जिवंत काडतुसे आहेत. या कारवाईत उपनिरीक्षक नामदेव दंडगे, उपनिरीक्षक प्रवीण सपांगे,  हवालदार बामणे, हवालदार शिवाजी दिघे, सचिन आटपाडकर,  अर्जुन सगर, नितीन पलूस्कर यांनी भाग घेतला.

गुन्हेगारांचे उच्चाटन करू : भारती

पोलिस उपअधीक्षक भारती म्हणाले, लोकांनी बेकायदेशीर हत्यारे आणि अशा गुन्हेगारांची माहिती पोलिसांना द्यावी. लोकांनी पोलिसांना सहकार्य केल्यास गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याच्या मोेहिमेस मदत होणार आहे.

Post a Comment

 
Top