0
भारतीय हवाई दलाने पुलवामाच्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आज प्रत्युत्त दिले. पाकिस्तानातील बालाकोटमध्ये शिरून १००० किलोची स्फोटके टाकण्यात आली. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादी ठार झाल्याचे सुत्रांनी सांगितले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शक्यतेमुळेच भारतीय सीमेवर तसेच आतल्या भागातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवाई दलाकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारी हल्ला चढविण्यात आला. त्या युद्धजन्य परिस्थितीत पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातून लष्करी वाहनांचा ताफा आणि लष्करांचे जवान मुंबईच्या दिशेने मंगळवारी (दि. 26) रवाना झाले. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांच्या हद्दीतून त्या ताफ्याला बंदोबस्त देण्यात आला. 

जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून सायंकाळी पुण्याकडून पिंपरी-चिंचवड शहरात लष्कराची  वाहने, त्याचे इतर सामग्री व जवानांचा ताफा येणार असल्याची माहिती पोलिस नियत्रंण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वाहतूक विभागाने या ताफ्याच्या पुढे दोन वाहने व पाठीमागे वाहने तसेच, पोलिस बंदोबस्त पुरवला होता. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यासह शहर पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्र हाय अलर्टवर असल्याचे सांगितले आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई कायमच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीत सुक्षेचा उपाय म्हणून पुण्यातून मुंबईकडे लष्करी वाहनांचा ताफा रवाना करण्यात आला आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास हा ताफा रवाना करण्यात आला.

भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर भारतीय सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरात खबरदारी घेतली जात आहे.   Post a comment

 
Top