0
शहरातील वॉल्नेस हॉस्पिटल,  शासकीय रुग्णालय समोरील आणि महात्मा बसवेश्‍वर उद्यान जवळील सुमारे दीडशे अतिक्रमणे महापालिकेने गुरुवारी जमीनदोस्त केली. कारवाई दरम्यान संतप्त खोकीधारकांनी अधिकारी, कर्मचार्‍यांना धक्काबुक्की, शिवीगाळ, दमदाटीचा प्रकार केला.


या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कैस शेख, रमजान मुल्ला यांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून नव्याने महात्मा बसवेश्‍वर उद्यान जवळ खोकीधारकांनी अतिक्रमणे निर्माण केली होती. उद्यान व उद्यानासमोरील रस्ता सार्वजनीक बांधकाम विभाग अंतर्गत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचा यापूर्वीही प्रयत्न करण्यात आला होता. परंतु विक्रेत्यांच्या विरोधामुळे ही मोहीम बारगळली होती. रस्ता आणि उद्यान सार्वजनीक बांधकाम खात्याअंतर्गत असतानाही या ठिकाणी खोकीधारकांना विद्युत कनेक्शनही देण्यात आले होते.

नव्याने निर्माण करण्यात आलेल्या अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा देण्याबाबतचाही काहींनी प्रयत्न केला होता. परंतु तो आजच्या कारवाईने असफल ठरला आहे. सदर ठिकाणी पन्नासहून अधिक खोकी वसविण्यात आली होती. तर काहींनी आपली जागाही निश्‍चित करुन ठेवली होती. अतिक्रमणे जेसीबी यंत्राच्या सहाय्याने जागेवरच नष्ट करण्यात आली. अतिक्रमणे हटविण्यास काही खोकीधारकांनी जेसीबी यंत्रासमोर उभे राहून अडविण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी स्वत:हून खोकी काढून नेली.  कर्मवीर भाऊराव पाटील चौकात हातगाडी व अन्य अतिक्रमणे काढताना व्यावसायिक आणि मनपा कर्मचारी यांच्यात वादावादी होवून अतिक्रमण पथकाचे लिपिक रवी यादव यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला.

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासमोर  चहा तसेच खाद्यपदार्थ, फळे आणि इतर साहित्य विकणार्‍यांची अतिक्रमणे वाढली होती. रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे अपघाताचाही धोका निर्माण झाला होता. या विक्रेत्यांना यापूर्वी वारंवार सूचना देऊनही त्यांनी अतिक्रमणे काढली नव्हती. रुग्णालयाच्या गेटपासून बालाजी मंगल कार्यालय पर्यंतची सर्व अतिक्रमणे आज हटविण्यात आली. यामध्ये सार्वजनीक बांधकाम खात्याचा एक फलकही उखडून टाकण्यात आला.

गेल्या काही वर्षांपूर्वी वॉन्लेस हॉस्पिटलसमोरील खोकी हटविण्यात आली होती. परंतु नंतर खोकीधारकांनी फुटपाथवरील जागेत अतिक्रमणे पुन्हा थाटली होती. या रस्त्यावरील खोकीधारकांनी पुर्नवसनाची मागणी केली होती. परंतु त्यांची मागणी फेटाळून लावत फेरीवाला धोरण अंतर्गत व्यवसाय करण्यास परवानगी देण्याचा विचार करता येईल असे म्हटले होते. परंतु याबाबतची अंमलबजावणी झाली नव्हती. गुरुवारी या ठिकाणची संपूर्ण अतिक्रमणेही जागेवरच जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमणे हटविताना अनेकवेळा मोहीम थांबविण्याचा तसेच अधिकारी, कर्मचारी यांना दमदाटी, शिवीगाळ, धक्काबुक्कीचाही प्रकार घडला. अतिक्रमणे हटविण्यास विरोध करणार्‍या कैस शेख, रमजान मुल्ला  या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

सहायक आयुक्तांवर अतिक्रमणाची हातगाडी उलटवली

अतिक्रमण करण्यात आलेली खाद्यपदार्थाची मोठी हातगाडी घेवून जात असता सहाय्यक आयुक्तांनी ती जागेवरच नष्ट करण्यासाठी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी हातगाडी घेवून जाणार्‍यांनीच हातगाडी अधिकार्‍यांच्या अंगावर उलटवली. अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहाय्यक आयुक्तांना बाजूला केल्याने ते बचावले. अतिक्रमण हटविण्यापूर्वी व हटविण्याची कारवाई सुरू असताना अधिकार्‍यांवर काही जणांकडून राजकीय दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाला. परंतु हा दबाव झुगारुन अतिक्रमणाची मोहीम राबविण्यात आली.

Post a comment

 
Top