0

'लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत ४२ जागांवर विजय मिळाला होता. यंदा कोणत्याही परिस्थितीत त्यापेक्षा अधिक म्हणजे किमान ४३ जागांवर आम्ही विजय मिळवू,' असा दावा करतानाच पूर्ण ताकदीने सर्वच्या सर्व ४८ जागा लढविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
'लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत ४२ जागांवर विजय मिळाला होता. यंदा कोणत्याही परिस्थितीत त्यापेक्षा अधिक म्हणजे किमान ४३ जागांवर आम्ही विजय मिळवू,' असा दावा करतानाच पूर्ण ताकदीने सर्वच्या सर्व ४८ जागा लढविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी निवडणुकीचे रणशिंग फुंकले; परंतु ही घोषणा करताना त्यांनी शिवसेनेचा उल्लेख टाळल्यामुळे निवडणुकीत युती होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून 'कमळा'चाच उमेदवार लढेल, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच लक्ष्य असल्याचे स्पष्ट केले. 

पुणे, शिरूर आणि बारामती मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संमेलनात फडणवीस बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष दानवे आदी या वेळी उपस्थित होते. फडणवीस हे भाषणासाठी उभे राहाताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या निवडणुकीतील ४२ जागांच्या यंदा ४१ जागा होणार नाहीत, या दानवे यांच्या वक्तव्याचा धागा पकडून फडणवीस म्हणाले, 'गेल्या वेळी आमच्या ४२ जागा आल्या होत्या. या वेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत ४३ जागा करू. मात्र ४१ जागा येऊ देणार नाही. आमचा तर प्रयत्न असा आहे, की आम्ही पूर्ण ताकदीने ४८ जागा लढवतो आहे. दानवे यांनी सांगितलेली ४३ वी जागा बारामतीची असेल,' असे म्हणत 'काय बारामतीकर,' अशी विचारणा त्यांनी बारामतीच्या कार्यकर्त्यांनाही केली. 'गेल्या निवडणुकीत थोडक्यात हुकलेला विजय यंदा मिळविणार आहोत. गेल्या निवडणुकीत कमळाचे चिन्ह असते, तर जिल्ह्यात सगळीकडे भाजपचा विजय झाला असता. ही चूक पुन्हा होणार नाही,' असे सांगून बारामतीमधून कमळाचाच उमेदवार लढेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेसह अन्य पक्षाची युती होती. यामध्ये युतीने ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. येत्या निवडणुकीत अद्याप युतीबाबत निर्णय झालेला नाही. मात्र युती होईल, असा विश्वास सर्व भाजप नेते व्यक्त करीत होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्ण ताकदीने ४८ जागा लढविण्याचे वक्तव्य केल्याने युतीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. 


Post a comment

 
Top