0
शस्त्रक्रिया सुरू असताना घडली घटना, रुग्णांना कवेत घेऊन पळाले नातेवाईक

जळगाव : हॉस्पिटलवर डॉक्टरांनी बनवलेल्या कुटीला अचानक आग लागल्याची घटना विसनजीनगरातील माॅन्साई हॉस्पिटलमध्ये गुरुवारी दुपारी २.१५ वाजता घडली. या वेळी डॉक्टर एका महिलेवर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करीत असल्याने एकच धांदल उडाली. आगीच्या भीतीपोटी शस्त्रक्रिया झालेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक जीव वाचवण्यासाठी वेदनेसह रुग्णालयाच्या खाली पळाले. त्यानंतर रुग्णालयासमोरच गल्लीमध्ये रुग्णांना सलाइन लावून अक्षरश: रस्त्यावरच झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.



विसनजीनगरात एम.डी.असलेल्या डॉ.राजीव नारखेडे यांचे माँन्साई हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या गच्चीवर डॉ. नारखेडे यांनी ताटवे, लाकडे व प्लास्टिक लावून कुटी तयार केली आहे. गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास डॉ.नारखेडे हे हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर सावखेडा येथील अर्चना अनिल सपकाळे (वय २६) या महिलेवर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करीत होते. दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास त्यांच्या रुग्णालयाच्या छतावरील कुटीमधून धूर निघू लागला. याबाबत रुग्णालयातील कर्मचारी व समोरील नागरिकांनी डॉक्टरांना माहिती दिली. त्यानंतर डॉक्टर ऑपरेशन थेटर सोडून गच्चीवर कुटीच्या दिशेने पळाले. आगीनंतर हॉस्पिटलमध्ये धांदल उडाली.


रुग्णांना कवेत घेऊन पळाले नातेवाईक :
आग लागल्यानंतर कुटीतून मोठ्याप्रमाणात धूर निघत होता. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना नातेवाईक हाताला लावलेल्या सलाइनसह कवेत घेऊन रुग्णालयाबाहेर पळाले. डॉ.नारखेडे यांच्या आई यशोदाबाई नारखेडे यासुद्धा आजारी होत्या. त्यांनाही सलाइन लावण्यात आली होती. डॉक्टरांच्या आईसह सर्व नऊ रुग्ण व त्यांचे नातेवाईक क्षणार्धात रुग्णालयाच्या खाली आले. शस्त्रक्रिया झालेली असल्याने रुग्णांना वेदनेने वेढलेले होते.


पूजा, होम हवनसाठी उभारली कुटी : 
रुग्णालयाच्या गच्चीवर डॉ.नारखेडे यांनी ताटव्यांची कुटी उभारलेली आहे. डॉक्टर या कुटीत राहतात. या कुटीत पूजा, होम हवन नेहमी करण्यात येते. आवश्यक घरगुती वस्तू व त्यांची पुस्तके,फाइल्स व देवी- देवतांचे फोटो व मूर्ती या कुटीमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. या कुटीतच डॉक्टर झोपतात. रुग्णालयाच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर डॉक्टरांचे दालन, वॉर्ड व ऑपरेशन थेटर आहे.


डॉक्टरांना काळ्या रंगाचे वावडे :
माँन्साई हॉस्पिटलच्या भिंतीवर कृपया अशी सूचना लिहिण्यात आलेली आहे. त्यामध्ये कोणीही काळे कपडे घालून, काळी बॅग व काळा चष्मा घेऊन येऊ नये, अशी सूचना लिहिण्यात आलेली आहे. एम.डी.असलेल्या या डॉक्टरांच्या या अनोख्या तऱ्हेबाबत घटनास्थळी नागरिकांमध्ये चर्चा होती.


हॉस्पिटलमध्ये संतती नियमनाच्या शस्त्रक्रियेचे रुग्ण जास्त :
रस्त्यावर झोपवण्यात आलेल्या रुग्णांशी 'दिव्य मराठी'च्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्या वेळी रुग्णांनी सांगितले की, या हॉस्पिटलमध्ये अर्चना अनिल सपकाळे (वय २६, रा.सावखेडा) या महिलेवर गुरुवारी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. वत्सलाबाई बापू सोनवणे (रा.भिलखेडा) या महिलेवर गर्भ पिशवीची चार दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अनुसया भगवान शिंदे (वय ४८, रा.जामनेर) या महिलेवर गर्भ पिशवीची शस्त्रक्रिया करण्यात आली. नाजराबी जब्बार कुरेशी (वय २७, रा.डी-मार्ट परिसर) यांच्यावर संतती नियमनाची शस्त्रक्रिया झालेली आहे. सुनीता समाधान अंभोरे (रा.खेडी कढोली) या महिलेचे अॅपेन्डीक्सची शस्त्रक्रिया झाली. शिल्पा गुलाब कामठे (रा.शिवाजीनगर) यांच्यावर हार्नियाची शस्त्रक्रिया झालेली होती. लक्ष्मी देवचंद बाविस्कर (रा.वाल्मीकनगर), राजश्री पुरुषोत्तम ठाकरे (वय ३०, रा.भुसावळ) या महिला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात आलेल्या होत्या.


झाडाला आणि भिंतीला बांधल्या सलाइन
रुग्णालयाच्या समोर असलेल्या जागेत नागरिक कचरा टाकतात. या कचऱ्याजवळच डॉक्टर व रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना रस्त्यावरच शस्त्रक्रिया झालेल्या व इतर रुग्णांना रस्त्यावर झोपवले. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले नाही. निष्काळजीपणाचा कळस येथे बघायला मिळाला. त्यांच्या हाताला लावलेल्या सलाइन तेथील झाडांना व भिंतीवर टांगण्यात आले होते. शस्त्रक्रिया झालेले रुग्ण वेदनेने विव्हळत होते. तर डॉक्टर नारखेडे व त्यांचे कर्मचारी आग विझवण्यात मग्न होते. मनपाच्या दोन बंबांनी दुपारी ३ वाजता आग आटोक्यात आणली. या आगीत कुटीतील पुस्तके, फाइल्स, कपडे व इतर घरगुती साहित्य जळाले आहे.


शस्त्रक्रिया झालेले रुग्ण नसल्याचा डॉक्टराचा दावा
रुग्णालयाच्यावर होम व पूजेसाठी कुटी बांधलेली आहे. त्यामध्ये मी राहतो. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागलेली आहे. माझ्याकडे मलेरिया, ताप, सर्दीचे तीन ते चार रुग्ण आले होते. ते खाली थांबलेले आहेत. शस्त्रक्रिया झालेले रुग्ण असल्याबाबत डॉ.नारखेडे यांनी पत्रकारांशी नकार दिला. A fire in the hospital in Jalgaon

Post a Comment

 
Top